Sobat Sakhichi : सोबत सखीची – स्त्रिया लहरी असतात का ?

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रिया लहरी असतात का?या विषयावरील या मालिकेतील हा चौथा भाग…


सोबत सखीची – भाग 4

स्त्रिया लहरी असतात का ? 

स्त्रिया लहरी असतात का? तुमचं उत्तर काय असेल मला ते मला नक्की सांगा. माझं उत्तर विचाराल तर माझं उत्तर आहे होय…स्त्रिया लहरी असतात. पण त्या का लहरी असतात? याच शास्त्रीय उत्तर माझ्याकडे आहे, आणि आज मी तेच तुमच्याशी शेयर करणार आहे.

मागच्या लेखामध्ये आपण मासिक पाळीच्या चक्राविषयी माहिती जाणून घेतली. तुम्ही मागचा लेख वाचला नसेल तर आधी तो लेख वाचा म्हणजे आजची माहिती तुम्हाला कळण जास्त सोपं जाईल.

आजच्या लेखामध्ये आपण स्त्रियांच्या बाबतीत महत्वाच्या असणार्‍या दोन हार्मोन्स बद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे इतरही हार्मोन्स महत्वाची आहेत, पण स्त्रियांच्या लहरी स्वभावाला कारणीभूत असणारी ही दोन महत्वाची हार्मोन्स आहेत.

ती हार्मोन्स आहेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन.

ही हार्मोन्स अगदी लहानपणापासून स्त्रीच्या शरीरात अत्यल्प प्रमाणात असतात. पण त्यांची व्यक्तता आणि शरीरावर होणारे परिणाम दिसण्यासाठी पौगंडावस्था उजाडावी लागते.

पौगंडावस्थेलाच टीन एज (Teenage) असेही म्हणतात. म्हणजेच 13, 14, 15 असे 19 म्हणजे साधारण एकोणीस वर्षापर्यंत ही पौगंडावस्था असते. या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. यातल्या इस्ट्रोजेनला स्त्रीत्वाचं हार्मोन म्हणतात कारण एका ​बालिकेपासून तरुणी पर्यन्तच्या प्रवासात जे जे शारीरिक बदल होतात, त्यावर इस्ट्रोजेन चा प्रभाव अधिक असतो.

तर प्रोजेस्टेरोनला मातृत्वाच हार्मोन म्हणतात. गर्भाशयाच्या आतला स्तर प्रेग्नंसीच्या दृष्टीने तयार करणे, पहिल्या तीन महिन्यात गर्भ टिकून राहण्यासाठी त्याला सपोर्ट करणे यासरखी मातृत्वाच्या दृष्टीने आवश्यक कामं प्रोजेस्टेरोन करत असते.

मागच्या लेखात आपण मासिक पाळीच्या प्रक्रियेची तुलना रिले रेसशी केली होती. त्यात मासिक पाळीचा जो संदेश होता, त्यालाच आपण हार्मोन हे नाव देऊया.

तो संदेश एका participant पासून निघून दुसर्‍या पर्यंत पोचतो, म्हणजे  Hypothalamus पासून निघून Pitutory पर्यन्त पोचतो. Pitutory चा रोल म्हणजे आपला संदेश Ovary पर्यन्त पोचवणे आणि त्याच्यापुढे ओव्हरीचा रोल.

हे मासिक पाळीच चक्र एक महिनाभर चालत आणि यावर हार्मोन्सचा मोठा पगडा असतो. या मासिक पाळीच्या चक्राचे तीन भाग करता येतात. पहिला भाग आहे स्त्रीबीज तयार होण्यापूर्वीचा म्हणजेच ovulation पूर्वीचा. दूसरा भाग आहे, ovulation चा. Ovulation म्हणजे स्त्रीबीज त्याचं कव्हर फोडून बाहेर येण्याचा दिवस. आणि तिसरा भाग आहे ovulation नंतरचा. यातल्या ovulation च्या आगोदरच्या भागात इस्ट्रोजेन या हार्मोन चा प्रभाव अधिक असतो, तर ovulation नंतर च्या काळात प्रोजेस्टेरोनचा प्रभाव असतो.

मासिक पाळीच्या चक्रामध्ये यांचे प्रमाण सतत बदलत असते. ही इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ची जशी जोडगोळी आहे, तशीच FSH आणि LH या दोन हार्मोन्स ची जोडगोळी आहे. मासिक पाळीच्या चक्रामध्ये या चौघांचे रक्तातले प्रमाण ठराविक क्रमाने वर खाली होत असते. आणि यांच्या लेव्हल बदलल्या की सिरोटोनिन, डोपामिन आणि एंडोर्फिन या सारख्या महत्वाच्या हार्मोन्सच्या लेव्हलसुद्धा वर खाली होतात. या हार्मोन्स वर आपल्या सर्वांचा मूड, मानसिकता आणि क्रिएटिव्हिटी अवलंबून असते.

पाळी येण्याच्या आठ ते दहा दिवस आधीपासुन काही स्त्रियांमध्ये बदलत्या हार्मोन्समुळे लक्षणे दिसायला सुरुवात होतात. यात खूप व्हरायटी असते. काही जणींमध्ये ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे, ब्रेस्ट दुखणे, छाती जड झाल्यासारखी वाटणे यासारखी काही लक्षणे दिसतात तर काही जणीमध्ये वजन वाढणे, अंगाला सूज येणे, पिंपल्स येणे या सारखी लक्षणे दिसतात. काही जणींना शारीरिक ​त्रासासोबत चिडचिडेपणा, डिप्रेशन, डोकेदुखी, अ‍ॅसिडिटी यासारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो.

या काळात एवढ्या तेवढ्या गोष्टींनी त्यांचा मूड जातो, कंटाळा येतो, रडू येतं…बरच काही होतं …. नवर्‍याला कळत नाही, बायकोला झालय तरी काय? दोन दिवसांपूर्वी छान शॉपिंग करून आलोय, सगळ्या गोष्टी मनासारख्या चालू आहेत, हिला नक्की खुपतय तरी काय? हे त्याला ही कळत नाही, तिलाही ते धड सांगता येत नाही… पण तीच बायको कधी कधी इतकी प्रेमात येते, इतकी समजूतदारपणे वागते, की तो कन्फ्युज होतो की हे नक्की चाललाय तरी काय? ही घटकेत अशी आणि घटकेत तशी… अशी कशी वागू शकते ?

मासिक पाळी आणि ही युद्धजन्य परिस्थिति यांचा कॅलेंडर नुसार संबंध शोधून काढल्यास लक्षात येईल की मासिक पाळीच्या आधी त्रागा करणारी स्त्री मासिक पाळी येऊन गेल्यानंतर एकदम नॉर्मल असते, खूप छान मूड मध्ये असते. मासिक पाळीच्या आगोदरच्या या लक्षणांना PMS म्हणजे pre menstrual syndrome असे म्हणतात.  त्यात जसजसे वय वाढत जाते ​तसतसे हे प्रमाण काही जणींमध्ये वाढायला ही लागतं. मासिक पाळी बंद होण्याच्या काळात याचं प्रमाण जरा जास्तच वाढतं.

हे जर तुमच्याहि घरात होत असेल तर त्या नवर्‍याना माझी एक छोटीशी विनंती… थोडं समजून घ्या… तुमच्या सखीचा लहरीपणा जितका हट्टी आहे, तितकाच प्रेमळ सुद्धा आहे…

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.