Sobat Sakhichi : सोबत सखीची – सर्वात सुंदर आणि सर्वात शापित नातं…

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. सर्वात सुंदर आणि सर्वात शापित नातं… या विषयावरील या मालिकेतील हाआठवा​ ​भाग…


सोबत सखीची – भाग 8

सर्वात सुंदर आणि सर्वात शापित नातं…

मागच्या आठवड्यातला व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांचे छान अभिप्राय आले, फोन आले त्यात लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराची वाढलेली  प्रकरणे, नवरा बायकोंमधले विकोपाला गेलेले वाद, घटस्फोटासाठी वाढते अर्ज यावर अनेक angle नी चर्चा झाली. हा विषय घेऊन स्पेशल एक व्हिडियो बनवावा असे अनेकांनी सुचवले. खरतर मी स्त्रीरोग तज्ञ आणि आहार तज्ञ आहे, मानसोपचार तज्ञ नाही, पण तिच्या आणि त्याच्या स्वभावासंदर्भात काही छान पुस्तकं, articles वाचली आहेत, माझ्या 22 वर्षांच्या प्रॅक्टीस मध्ये पेशंटचे अनेक अनुभव जवळून बघितले आहेत. माझ्या २२ वर्षांच्या संसारात अनेक चढ उतार अनुभवले आहेत, त्यातले काही निष्कर्ष आणि अनुमान तुमच्याशी शेयर करणार आहे.

मागच्या व्हिडियो मध्ये आपण एक प्रश्न विचारला होता, की तो आणि ती या साच्यातलं सर्वात सुंदर आणि तितकंच शापित असं नातं कोणतं ? अंदाज बरोबर आहे तुमचा…. हे नातं आहे नवरा बायको चं ….जितकं सुंदर तितकच शापित…. सुंदर अशासाठी की जर नीट निभावल तर ती आणि तो चा जास्तीत जास्त सहवास असलेल ते नातं आहे. आणि शापित अशासाठी की आज पर्यन्त अनेक वर्षांच्या सहवासानंतर सुद्धा एकमेकांवर एकदम खुश असलेलं आणि एकमेकांबद्दल कसलीही कम्प्लेंट नसलेल एकही जोडपं कुणाच्याही बघण्यात नाही. मग ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो नाहीतर आजकालच्या काळातल live in relationship असो. बघा तुम्हाला पटतय का ?

खरतरं जेव्हा तो आणि ती यांची नवीन ओळख असते, तेव्हाही स्त्रीच्या एकन् एक पेशीत XX क्रोमोसोम्स आणि पुरुषात XY क्रोमोसोम्स असतात आणि पूर्ण आयुष्यभर ते तसेच रहाणार असतात. स्त्रीला पुरुषाच्या Y क्रोमोसोम मध्ये असलेली आक्रमकता आवडते, धसमुसळा स्वभाव, त्याचं आपल्यावर अवलंबून असण तिला आवडतं, प्रेमाच्या बाबतीत त्याने घेतलेला पुढाकार आवडतो. ती या गुणांकडे attract का होते? कारण हे गुण तिच्यात नसतात. पुरुषाला XX मुळे नैसर्गिक असलेलं स्त्रीचं लाजण, सुंदर दिसणं, नाजुकपण सगळ आवडतं. तिचं केअरिंग नेचर त्याला खूप आवडतं. कारण हे गुण त्याच्यात नसतात. म्हणूनच तर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे प्रेम, आकर्षण आयुष्यभर असेच टिकून राहील असा विश्वास त्यांना वाटतो म्हणून ते दोघं लग्न करण्याचा आणि आयुष्यभर एकत्र रहाण्याचा निर्णय घेतात.

लव्ह मॅरेज असू दे नाहीतर अरेंज मॅरेज, प्रत्यक्षात जेव्हा दोघे एकत्र रहायला लागतात, त्यावेळी खऱ्या स्वभावाची ओळख होते. ज्या सहवासासाठी पूर्वी तरसत होते, ते रोजचेच झाल्यावर त्यातलं कौतुक कमी होऊन जातं आणि एकमेकांची उणिदुणी दिसायला लागतात. जसा सहवास वाढतो, तसं अति परिचयात अवज्ञा व्हायला लागते. एकमेकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांना गुण दोषांच लेबल लागायला लागतं. ज्या आक्रमकतेच्या प्रेमात ती पडली असते, त्याच आक्रमकतेला भांडकुदळ स्वभावाचं लेबल लागतं, त्याच्या आपल्यावर अवलंबून रहाण्याचा वैताग येतो. त्याला देखील तिची अति काळजी टोचायला लागते, त्याला त्यात गुदमरल्यासारख व्हायला लागतं. हळूहळू प्रियकराचा टिपिकल नवरा होतो आणि प्रेयसीची देखील बायको होऊन जाते आणि नात्यातला पूर्वीचा चार्म हळूहळू कमी व्हायला लागतो. जेव्हा एकमेकांना गृहीत धरण्याच प्रमाण वाढायला लागतं तेव्हा स्वाभिमान दुखावायला लागतो आणि जोडीदाराची मनातली प्रतिमा डागाळायला लागते. लग्नानंतर थोड्याफार फरकाने सगळीकडे हीच स्टोरी का दिसायला लागते ?

काय होतं नक्की ? आणि का होतं ? लग्नानंतर नवरा बायकोचे स्वभाव बदलतात का? का बदलतात ? या बदलांसाठी प्रत्येक वेळी जीन्स, क्रोमोसोम्स, हार्मोन्स हीच कारणं असतात का ? नाही…या कारणांइतकेच   आर्थिक परिस्थिति, ताणतणाव, संसारातल्या इतर जबाबदाऱ्या, कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस असे अनेक factors यात involve असतात. त्या दोघांच्या पूर्वायुष्यातले अनुभव, त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांच्या मनावर कोरले गेलेले प्रसंग या अनेक गोष्टींचा वागण्या बोलण्यावर परिणाम होत असतो. ही एक मोठी गुंतागुंतीची आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेण्याची प्रोसेस आहे.

खरतर सतत एकमेकांच्या संपर्कात आणि सहवासात राहून स्त्री आणि पुरुष दोघेही हळूहळू एकमेकांना आपल्यासारखेच मानायला लागतात आणि त्याप्रमाणे वागायला लागतात. त्यातून अनेक इच्छा आणि अपेक्षा एकमेकांवर लादल्या जातात. स्त्रीला वाटत असतं की नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, आपल्या संसाराला वेळ द्यावा, कारण लग्नानंतर तिची प्रायोरीटी बदलली असते, त्यामुळे तिला असं वाटत असतं की नवऱ्याची पण बदलावी. पुरुषाला संसाराच महत्व नसतं असं नाही, पण तो तिच्या इतका संसारात गुंतून पडत नाही. हे संसारात न गुंतण्याचं त्याचं नेचर जेव्हा तिच्या लक्षात येतं, तेव्हा ती चेहऱ्यावरून जरी हसत असली, तरी मनातून ती दुखावते आणि दुरावते. बरेचदा पुरुषाला हा बदल लक्षातच येत नाही, कधी कधी लक्षात येतो पण सिरियसनेस त्याला कळत नाही. लक्षात आल्या आल्या नवऱ्या ने पुढाकार घेऊन ते पडलेलं अंतर मिटवून टाकलं तर ठीक, नाहीतर ही दरी आणि गैरसमज वाढत जातात. काहीतरी चुकतंय हे दोघांच्याही लक्षात येतं, पण नात्यातला संवाद आणि मोकळेपणा हरवायला लागतो त्यामुळे नक्की काय चुकतंय हे लक्षात येत नाही. खरतर ती दोघही आपापल्या परीने आपापले दोष सुधारायला जातात, पण तरीही दरी मात्र वाढतच जाते. का माहितीये ? कारण ते दोघे स्वत‌:चे दोष स्वत:च काढतात, आणि स्वत:च त्यावर आपल्या पद्धतीने सोल्युशन काढतात. समोरच्याला विचारत नाही. खरं तर साधी गोष्ट आहे, द्यायचंय असेल तर  समोरच्याला आपल्याकडुन काय हवंय हे समजून घेणं महत्वाच नाही का?

X आणि Y च्या अशा  छोट्या छोट्या गोष्टी संसारात मोठे मोठे खटके उडवून देतात…

एक कडू गोड अनुभव… ज्यातून मी ही गेली आहे…..बऱ्याच स्त्रियांना आपल्या नवऱ्याचे दोष फार पटकन दिसतात आणि त्या मन लाऊन त्याला सुधारण्याच्या मागे लागतात. त्यांचा हेतू वाईट नसतो, आपला जोडीदार सर्व बाजूंनी परिपूर्ण असावा, दुसऱ्या कुणी ते दोष दाखवून त्याला अपमानास्पद वाटण्यापेक्षा आपणच त्याच्या लक्षात आणून देऊया अशी तिची त्यामागची शुद्ध भावना असते. पण ते एक्स्प्रेस  करण्यची पद्धत कधी कधी त्याच्या साठी इतकी irritative असते की तअशावेळी तो सुधारत तर नाहीच, उलट आपण नाकारले जात आहोत, आपल्यात काहीतरी कमी आहे असा न्यूनगंड भावना त्याच्या मनात घर करायला लागतो. खरतरं पुरुष पटकन कधी सुधारतो माहितीये ? त्याला त्याच्या स्त्रीने तो आहे तसा स्वीकारला तर. तिचा त्याच्यावरचा विश्वास जितका पक्का असतो, तितका तो आपणहून तिच्यासाठी काही करायला उद्युक्त होतो, आपणहून स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. मात्र जेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तो स्वत: मधला जिवंतपणा ही हरवून बसतो. तसच स्त्री पुरुषाच्या मनासारखी कधी वागते माहितीये ? जेव्हा तो तिची काळजी करायला सुरुवात करतो.  आपल्यावर विश्वास दाखवला जाणं ही पुरुषाची गरज असते तर काळजी घेतली जाणं ही स्त्री ची गरज असते.

स्त्रीला स्वत:ला जवळीक खुप आवडत असते, सतत कनेक्टेड रहायला तिला खुप आवडत असतं…पण पुरुषाला मात्र जवळीक आणि स्वातंत्र्य याची आलटून पालटून गरज असते. त्याला दूर जाण्याची संधीच दिली नाही, तर तिची जवळीक, तिचा सहवास मिळवण्याची त्याची इच्छा आणि आतुरता हळुहळू तो गमावून बसेल हे तिच्या लक्षातच येत नाही. ती त्याच्यावर अधिकाधिक प्रेमाचा वर्षाव करत रहाते, बोलण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत रहाते, आणि पुरुष मात्र अधिकाधिक लांब जात राहतो.

खरतर एकमेकांना एकमेकांच्या भूमिकेतून समजून घेणे हे प्रॉपर सोल्यूशन आहे. म्हणजे काही अडचण आली किंवा  नाही आली तरी अधून मधून अचानक अबोल होण, विचारांच्या गुहेत एकट्याने जाऊन बसण ही  पुरुषाची गरज आहे, त्याचा स्वभाव आहे हे त्याच्या स्त्रीने, किंवा बायकोने जाणून घेतले पाहिजे ती वेळ बरोबर ओळखली पाहिजे  आणि तो बाहेर येइपर्यन्त त्याच्यावर विश्वास् ठेऊन निर्धास्त राहिले पाहिजे. त्याला सतत disturb करत राहिलं की त्याला अजून ताण येत राहतो.  तो जेव्हा आपल्या गुहेत शिरलेला असतो तेव्हा आपणही आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये रमावं.. तिचं स्वत:च एक सर्कल असाव, ज्याच्यातुन तिला भावनिक आधार मिळेल. प्रत्येक वेळी तुझ्या साठी मी कशी घर दार सोडून आले आहे, असे संगून आपल्या भावनिक संगोपनच ओझं त्याच्या गळ्यात टाकु नये.

आपल्या प्रत्येक आनंदाच कारण तोच असला पाहिजे असा अट्टाहास धरु नये. इतर छोट्या छोट्या अनेक गोष्टीतून आपला आपण आनंद मिळवाव.

पण त्याच वेळेला पुरुषाने ही हे समजून घेतले पाहिजे की बोलून व्यक्त होत रहाणे ही तिची गरज आणि स्वभाव आहे. ती ज्यावेळी  व्यक्त होण्याच्या मुड मध्ये असते, तेव्हा त्याने फ़क्त श्रोत्याच्या भुमिकेतुन ते ऐकाव आणि तिच्या बद्दल सहानुभूति व्यक्त करावी. त्यावेळेला तिला सल्ला देण्याची चुक करु नये. स्त्रीच्या हातात महिन्याचा पगार देतो, भरपूर पैसा देतो  म्हणजे आपन तिच्या भावनिक गरजाहि पुऱ्या करतो अशा भ्रमात पुरुषाने राहु नये. पुरुषाचा गुहेत जाण्याचा अधिकार जर मान्य व्हायला हवा असेल तर स्त्रीचा अस्वस्थ होण्याचा अधिकार त्याने तिला दिला पाहिजे. कधी कधी सगळं काही व्यवस्थित असूनही तिला उगीचच रिकामपण येतं, अस्वस्थपणा येतो …असं व्हायला शरीरातले हार्मोन्स कसे कारणीभूत असतात यासाठी आपण एक व्हिडियो बनवला आहे. तो तुम्ही नक्की बघा. आजच्या विषयाशी निगडीत दोन पुस्तकं फार सुंदर आहेत, इंग्रजी मधल्या पुस्तकाच नाव आहे, “मेन आर फ्रॉम मार्स ॲंड वुमेन फ्रॉम व्हीनस” आणि त्याच पुस्तकावर मराठी अनुवाद आहे “तो आणि ती_ …ही दोन्ही पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचा…यातला positive टेक होम मेसेज असा आहे की  दोघांनी एकमेकांशी योग्य भाषेत आणि स्पष्ट शब्दात संवाद साधण्याची आणि एकमेकांना एकमेकांच्या भूमिकेतून समजून घेण्याची सवय केली, तर काहीच कठीण नाही.

आता माझ्याकडे बघून तुम्ही असा अंदाज बांधत असाल की मी एवढी लेक्चर देतीये म्हणजे आम्हा नवरा बायकोची भांडणं अजिबात होत नसावीत, तर तुम्ही साफ चुकता आहात. ही सगळी थेअरी माहिती असून सुद्धा आमच्यात भरपूर भांडणं होतात. मात्र आता आम्ही आधी भांडलो तरी नंतर ते एंजॉय करतो आणि लवकरात लवकर मिटवून टाकतो. त्याबद्दल अढी मनात ठेवत नाही…कारण इतक्या वर्षांच्या सहवासात कोणत्या गोष्टी आम्ही स्वत: करतो, आणि कोणत्या गोष्टी आमच्या X आणि Y च्या गुणधर्मामुळे घडतात एवढं तरी नक्कीच आम्हाला समजायला लागलय.

टीप- सोबत लिंक दिलेला व्हिडिओ जरूर बघा…

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.