Sobat Sakhichi : सोबत सखीची – ‘स्वभाव’ तिचा आणि त्याचा

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रिया लहरी असतात का?या विषयावरील या मालिकेतील हा ​​सातवा ​भाग…


सोबत सखीची – भाग 7

‘स्वभाव’ तिचा आणि त्याचा

नमस्कार. आपण या लेखांमधून स्त्रियांच्या आरोग्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर माहिती घेत असतो. ही लेखमाला फक्त स्त्रियांसाठी आहे का? अहो नाही… हे लेख सर्वांसाठी खुले आहेत.

आपल्या सर्वात जवळची स्त्री मग ती आपली आई असेल, बायको, बहीण, मैत्रीण कुणीही असेल, तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था समजून घेण्यासाठी पुरुषांनी तर हे लेख आवर्जून वाचले पाहिजेत. आजचा लेख तर तो आणि ती अशा दोघांनीही वाचला पाहिजे. आजच्या लेखात आपण ती आणि तो यांचा स्वभाव, त्यांची वैशिष्ट्ये, आणि त्यातून दैनंदिन जीवनात येणारे काही अनुभव यांच्याबद्दल समजून घेऊ…चला तर मग!

तुम्हाला आठवत असेल स्त्रीयांमध्ये XX तर पुरुषांमध्ये XY ही सेक्स क्रोमोसोम्सची जोडी असते, आणि इंटरेस्टिंगली स्त्री आणि पुरुष यांच्या भिन्न स्वभावाचं उत्तर या क्रोमोसोम्स मध्ये दडलेलं आहे.

X हा क्रोमोसोम प्रेम, दया, सौंदर्य, काळजी यांचं प्रतिक आहे. स्त्री मध्ये तर दोन्ही क्रोमोसोम्स X च आहेत. त्यामुळे या गोष्टी तिच्यात भरभरून असतात. स्त्रीच्या अंगात उपजत मातृत्व आणि त्याच्याशी निगडीत दातृत्व हा फार मोठा गुण आहे. कुणालाही ती फार पटकन सॉरी म्हणू शकते, आणि तितक्याच मोठ्या मनाने माफही करू शकते. बोलत राहून व्यक्त होणे हा स्त्रीचा स्वभाव आणि तिची गरज आहे. पुरुषांच्या XY मध्ये एकच X असतो, त्यामुळे दिसताना तो स्त्री पेक्षा कमी हळवा दिसतो.

त्याच्यात असणारा Y क्रोमोसोम मुळात आक्रमकतेचं, वर्चस्वाचं, बलवान असल्याचं  प्रतिक आहे. त्याच्या Y च्या ताकदीपुढे त्याचा X क्रोमोसोम बराच फिका पडतो. म्हणजे तो भावनाप्रधान नाही, काळजीवाहू नाही असे अजिबात नाही, फक्त त्याची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. त्याला बोलून व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला जास्त आवडतं. सतत वेगवेगळी आव्हान स्वीकारण आणि ती achieve करणं यात त्याला मंनापासून आनंद मिळतो.

फार लहान वयापासून जगण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि जगण्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता स्त्रियामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच वेळेच्या आधी डिलिव्हरी झालेलं किंवा डिलिव्हरीच्या प्रक्रियेत घुसमटलेल एखादं बाळ जर स्त्री लिंगाच असेल तर त्याचा survival रेट चांगला असतो, ते ट्रीटमेंटला फार positive response देतं. असे अनेक देशातले बालरोग तज्ञ सांगतात.

पुरुषांपेक्षा स्त्रियांना लवकर maturity येते. शारीरिक आणि मानसिकसुद्धा. मुलांपेक्षा मुली लवकर वयात येतात म्हणजेच पौगंडावस्थेची सुरुवात मुलींमध्ये मुलांपेक्षा लवकर येते. एकाच वयाचे स्त्री आणि पुरुष यांची तुलना केली तर वैचारिक परिपक्वता स्त्री मध्ये पुरुषापेक्षा अधिक असते. स्त्रियांचा 6 th सेन्स सुद्धा पुरुषांपेक्षा अधिक स्ट्रॉंग असतो. स्पर्शाचे वेगवेगळे अर्थ स्त्रिया फार लहानपणापासून ओळखू शकतात.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट. स्त्रियांकडे जन्मापासूनच एक very हाय मेगापिकसल चा कॅमेरा असतो. कुठे? त्यांच्या डोळ्यात, तुम्हीही हा अनुभव नक्कीच कधीतरी घेतला असेल. स्त्रिया एखाद्याच्या नजरेतून, body language मधून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या मनातले भाव सहजच ओळखू शकतात. त्यांची नजर फार तीक्ष्ण असते. स्त्रियांच्या दृष्टीपटलात पुरुषांपेक्षा जास्त rods आणि cones असतात. रोड्स आणि कोंस हे डोळ्याच्या एकदम आतल्या भागावर पडणार्‍या किरणांच्या साह्याने वस्तूचे आणि वस्तूच्या रंगाचे ग्रहण करणारे घटक आहेत. महत्वाच म्हणजे त्यांची संख्या एक्स क्रोमोसोम शी निगडीत असते, स्त्रिया तर काय ? डबल एक्स !! बोलायची बातच नाही… त्यामुळे रंगाच्या बाबतीतली कोणतीही गोष्ट त्या पुरुषापेक्षा जास्त डीप आणि डिटेल पारखून घेऊ शकतात, मग ती भाजी असो किंवा कपडे… मॅचिंग पहावे तर स्त्रीने. म्हणूनच कपड्याच्या दुकानात त्या पुरुषापेक्षा जास्त रमतात.

एकंदरीत दिसणे, असणे आणि छान  प्रेझेंटेबल रहाणे या गोष्टींना तिच्या लेखी खूप value असते. कारण ते तिच्या क्रोमोसोम्स मधेच असतं ना. प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याच्या बाबतीत जागरूक असतेच.  आपल्या आवडीचे कपडे, वस्तु यासाठी आपल्या ऐपती प्रमाणे का होईना पण वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करण्याची तिची तयारी असते.

एकच एक्स असणारा आणि त्यातही  Y जरा जास्तच स्ट्रॉंग असणारा पुरुष या स्त्रीसुलभ प्रवृत्तींचा राग राग करणारा असू शकतो… पण काय करणार ? नाईलाज आहे. त्याच्यात एकच X असल्यामुळे त्याला या गोष्टीची आवड नाही, जी थोडीफार आवड आहे, तिला Y ने बांध घालून ठेवलाय, आणि स्त्रीयांमध्ये एक सोडून दोन X….त्यामुळे तिकडे नटण्या थटण्याचा महापूर …आणि इकडे ओसाड वाळवंट अशी अवस्था होते.

दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांना एकमेकांची thinking प्रोसेस चांगली अवगत असल्याने त्यांच्यात एक नैसर्गिक अंडरस्टॅंडिंग असतं. न बोलता एकमेकांच्या अनेक गोष्टी ते समजून घेऊ शकतात. प्रॉब्लेम होतो तो एक तो आणि एक ती अशा नात्यांमध्ये.

आयुष्याच्या प्रवासात XX क्रोमोसोम ची जोडी असलेली स्त्री आणि XY ह्या क्रोमोसोम ची जोडी असलेला पुरुष अनेक नात्यात भेटत असतात.
कधी हे नातं आई आणि मुलाचं असतं, बहीण आणि भावाच असतं, कधी मित्र मैत्रीण, प्रियकर प्रेयसी तर कधी पती आणि पत्नीच असू शकतं. इतकच कशाला, दोन सहकार्‍यांच्या स्वरुपात, कधी बॉस आणि स्टाफ यांच्या भूमिकेत, कधी अनेक वर्षांच्या कौटुंबिक नात्यांच्या रूपात तर कधी अगदीच एकमेकांना अनोळखी स्वरुपात स्त्री आणि पुरुष एकमेकांना भेटत असतात. ती स्त्री कोणत्याही भूमिकेत असली, तरी तिच्या वागण्या बोलण्यावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर XX क्रोमोसोम चा पगडा असतो. आणि असणारच न…कारण शरीरातल्या प्रत्येक पेशीत एक जोडी XX असतेना ! तीच गोष्ट पुरुषाच्याही बाबतीत असते. भूमिका कोणतीही असो, त्याच्या XY combination चे गुण त्याच्या वागण्यातून झळकणारच.

या दोघांची एखाद्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता, ताणतणावाचा सामना करण्याची पद्धत मुळातच वेगवेगळी असते. पुरुषात मुळातच साहस करण्याची उर्मी असते, तो समस्येकडे आव्हान म्हणून बघतो आणि ताबडतोब त्याला उत्तर शोधायला जातो पण स्त्री घाबरून जरी जात असली तरी तिला लगेच उत्तर शोधण्याची घाई नसते. फक्त तिला ते शेयर करायच असत. ती तिच्या पद्धतीने समस्या हाताळण्याचा प्रयत्न करते, पण पुरुषाच्या भूमिकेतून ते उत्तर त्याला न पटणारं असतं, म्हणून मग शेवटी पर्यावसान वादावादीत होते.

तोच प्रकार आहे ताणतणावाचा… एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आला की स्त्री तिच्या अगदी जवळच्या व्यक्तींशी ते शेयर करते. ती व्यक्ति म्हणजे तिचा नवरा, मैत्रीण, मित्र, तिची आई बहीण कुणीही असू शकते…पण पुरुषाच तस नाही होत…त्याला स्ट्रेस आला की तो एकदम अबोल होतो आणि मनातल्या मनात त्या गोष्टींचा विचार करायला आणि त्याच्या पद्धतीने सोल्युशन काढायला जातो. त्याच वेळी त्याच्या जोडीदार स्त्री जी आई, बहीण, मैत्रीण, बायको कुणीही असू शकते तिला असं वाटायला लागतं की हा माझ्याशी काही शेयर करू इच्छित नाही, म्हणजे मी त्याला जवळची वाटत नाही, नात्यांच्या प्रवासात येणाऱ्या अनुभवातून एकमेकांचा स्वभाव उलगडत जातो.

आपण बरेचदा दुसऱ्याने स्वत:ला बदलले पाहिजे असा अट्टाहास धरून राहतो.पण दुसऱ्याला बदलण किती कठीण आहे, यापेक्षा स्वत:ला बदलणे किती सोपं आहे हे जेव्हा लक्षात येतं आणि त्याप्रमाणे कृती घडते, तेव्हा अपेक्षांचं ओझ खूप हलके होऊन जातं आणि आयुष्यात खरा आनंद मिळायला लागतो. एकमेकांना एकमेकांच्या भूमिकेतून समजून घेऊन नात्यातील स्पेस जपली की कोणतही नातं अधिकाधिक घट्ट होत जातं.
तो आणि ती या प्रकारच्या नात्यातल सर्वात छान आणि सर्वात शापित असलेलं नातं कोणतं? आणि का ? बघूया पुढच्या लेखामध्ये …तोपर्यंत धन्यवाद

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.