Pimpri: सामाजिक कार्यकर्ते सुरेश निकाळजे यांचा प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

Social activist Suresh Nikalje's initiative for plasma donation. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या आवाहनाला कोरोनामुक्त तरुणांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपचार उपयुक्त असल्याचं सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या तरुण रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरीतील आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी प्लाझ्मा दान केले आहे.

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या उपस्थितीत सुरेश निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लाझ्मा दान केले. यावेळी वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक वाघेरे यांनी निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मागील महिनाभरात पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे.

याचा ताण महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर येत आहे. असं असले तरी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.

कोरोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे.

परंतु असे लक्षात आले आहे की कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही.

यात अनेकदा रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे.

त्यामुळे कोणाला तरी निश्चित जीवनदान मिळेल, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.