Pimpri : शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्तींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतली धाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्तींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. सांगवीतील राधाकृष्ण धाम ट्रस्ट संचालित गुर्जर क्षत्रिय कडिया समाज यांच्याकडून प्रियदर्शनीनगर आणि ममतानगर तीनशे लोकांच्या राहण्याची व दोन वेळा जेवणाची सोय राधाकृष्ण मंदिर, प्रियदर्शनी नगरमध्ये केली होती.

तेजस्विनी कदम युवा मंचतर्फे पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व चादर वाटप करण्यात आले. पिंपरी बौद्धनगर भागात पावसाने थैमान घातला आहे. लोकांच्या घरात पूर्णपणे पाणी पाणी झाले आहे. वस्तीत रोगराई साचली आहे. अशा परिस्थितीत आज , भाजप शहर युवती आघाडी अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी पूरग्रस्त नागरिकांना भेटून त्यांची परिस्थिती पूर्णतः बघून, त्यांच्या सोबत संवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण युवा पिढीला संधी द्या जे तुमच्यासाठी कायम हजर असतील, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यांना गरजेप्रमाणे अन्नधान्य, ब्लॅंकेटचे वाटप करून मदत करण्यात आली. यावेळी शहर युवती आघाडी व सोशल मीडिया सदस्य उपस्थित होते.

आदर्श शिक्षण संस्था दिघी रोड भोसरीकडून कोल्हापूर-सांगलीवासीय पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला. जोरदार पावसामुळे सध्या कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला असून जनसामान्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. अशा वेळी संस्थेच्या चिमुकल्यांनी मदतीसाठी त्यांचा चिमुकला हात पुढे केला आहे. जवळजवळ दीड हजार किलो तांदूळ, अडीचशे किलो तूरडाळ, 200 किलो गहू , 500 बिस्किट पुडे, वापरण्याजोगे जुने कपडे मुलांनी आज संकटात सापडलेल्या आपल्या भावांसाठी जमा करून त्यांचे सामाजिक भान जागृत असल्याचे दाखवून दिले आहे.

चिमुकल्यांबरोबरच परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करून आपली कर्तव्य भावना दाखवली आहे. जमा झालेले सर्व धान्य कपडे सह्याद्री प्रतिष्ठान चिंचवड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ते हे सर्व साहित्य कोल्हापूर-सांगलीपर्यंत नेणार आहेत.  या उपक्रमाचे नियोजन शाळा प्रमुख तसेच नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी केले. तर उपमुख्याध्यापिका चित्रा औटी प्राचार्य वंदना लढे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक हे सहभागी झाले.

संपूर्ण महाराष्ट्र आज पुराच्या पाण्यामध्ये अडकला असताना पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. या पुरग्रस्तांना आज अन्न-पाण्याच्या मदतीची व त्यांना मानसिक धीर देण्याची गरज असताना या मदत कार्यासाठी दक्षिण भारतीय कल्याण संघटना धावून आली. या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला. गुलाबनगर झोपडपट्टी, भारतनगर आणि वंजारी वस्ती कासारवाडी येथील पूरग्रस्तांसाठी खाद्य पॅकेटची व्यवस्था केली. पीसीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना मदत साहित्य सुपूर्द केले. यासाठी संघटनेचे अध्यक्ष पद्मनाब शेट्टी, कार्यकारी अध्यक्ष राकेश नायर, सरचिटणीस सुनील गोपीनाथ, कार्तिक कृष्णा, गणेश अंंचन, निधीश नायर यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला. पीसीएमसीचे आरोग्य विभागचे हनुमंत पुणतांबेकर, संजय निकम, अरुण तुपे, संजय लांडगे आणि हणूमंत चौधरी यांचे त्यांना सहाय्य लाभले.

९ आगस्ट क्रांती दिनाचे व भारतीय युवक काँग्रेसचा स्थापना दिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज दु. १ वाजल्यापासून पिंपरी कॅम्प येथील मुख्य बाजारपेठेतून पूरग्रस्त मदत अभियान राबविले यातंगर्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधितांसाठी मदत संकलन फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांवर आलेल्या पूराच्या संकट काळात मदतीचा हात देण्यासाठी सढळ हातांनी मदत करण्याचे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. याला पिंपरी बाजारपेठेतील व्यापा-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यत: फळ बाजार, कापड बाजार, फूल बाजार व इलेक्ट्रॉनिक्स बाजार या ठिकाणातून मदत संकलन फेरी नेण्यात आली. यावेळी अर्थिक मदत देऊन व्यापा-यांनी पूरग्रस्त बांधवांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
“पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये सरकार केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे व एवढ्या भयानक परिस्थिती मध्ये ही भाजपाचे मंत्री हसत – रमत जणू वर्षा विहार करत असल्यासारखे वागत आहेत व हे च त्यांच्या मानसिकतेचे प्रतीक आहे, पिंपरी चिचंवडमधील पूर परिस्थिती देखील २००५ च्या पूराच्या झटक्याने न बदलता जैसे थे असल्याचे दिसून येत आहे व यावरून राज्यकर्त्याचा नाकर्तेपणा उघड झाला आहे, असे मत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सरकारचा निषेध करताना व्यक्त केले.
याप्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र  बनसोडे, एन एस यू आयचे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, एन एस यू आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, सचिन कोंढरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, प्रमोद सुर्यवंशी, दीपक भंडारी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव, अनिकेत ढोरे, नियाज खान,फारूख खान, पांडूरंग वीर आदी पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.