Pimpri: दुकानांसमोर काढले जाताहेत पांढरे वर्तुळ

प्रशासनाचे आदेश; अनेक ठिकाणी कार्यवाही

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार्‍या व्यवसायिकांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र भाजीपाल्यासह, दुध आणि किराणा दुकान व मेडिकल दुकारांसमोर होणारी गर्दी ही प्रशासनासमोरील डोकेदुखी बनली होती. यातून मार्ग काढण्यासाठी दुकानांसमोर पांढरे वर्तुळ काढून नागरिकांमध्ये योग्य ते अंतर राखले जात आहे. त्यामुळे गर्दीवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याबरोबरच नागरिकांमध्ये एक ठराविक अंतर निर्माण करण्यातही यश येवू लागले आहे.

सध्या देशासह राज्यात व पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची चांगलीच दशहत निर्माण झाली आहे. तर केंद्र शासनाकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला असून राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे.

करोनाची दहशत आणि जीवनाश्यक वस्तूंच्या तुटवड्याची भिती यामुळे शहरातील भाजीमंडई, मेडिकल, किराणा आणि दुधाची विक्री करणारे दुकाने यांच्यासमोर रोजच मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली होती. खरेदीसाठी जमा झालेले नागरिक एकमेकांच्या संपर्कात येवू लागल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त होत होती.

मात्र, प्रशासनाने याबाबत धोरण जाहीर केले असून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या दुकानांसमोर होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य रांगा, अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच दुकानासमोर ठराविक अंतरावर वर्तुळ व चौकोण आखण्याच्या सूचना केल्या आहेत.

शहरातील अनेक व्यापार्‍यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या दुकानासमोर असे चौकोन व वर्तुळ आखल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये ठराविक अंतर ठेवण्यात यश आले आहे. तर वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव यामुळे रोखला जाईल, अशी आशाही व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.