Pimpri : जलदिंडीच्या दशकपूर्ती निमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पवना नदीची आरती (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सुरु झालेल्या जलदिंडीला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुढील दोन महिने नदीशी संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात आज (मंगळवार) पवना नदीची आरती करून करण्यात आली. पिंपरी मधील झुलेलाल घाटावर हा आरतीचा कार्यक्रम झाला.

पवना नदीच्या आरतीसाठी नगरसेविका निता पाडाळे, गिरीजा कुदळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सोनू गुरुजी, दादा नूतनदास, डॉ. विश्वास येवले,  आदी उपस्थित होते. तसेच बाबा गोविंदराम झुलेलाल मंदिर साई चौक, बाबा छतुराम झुलेलाल मंदिर पिंपरी,  इस्कॉन मंदिर आकुर्डी, जलदिंडी प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस व नागरिक मित्र, भावसार व्हिजन, अंघोळीची गोळी, पावन पवना, ज्येष्ठ नागरिक महासंघ, सावरकर मित्र मंडळ, थेरगाव सोशल फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, वर्तमान आदी संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला.

जलदिंडीच्या माध्यमातून विविध संस्थांनी नदी स्वच्छता, नदी प्रदूषण, नदीचे महत्व यांसारख्या विविध विषयांवर काम केले आहे. जलदिंडीला यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पुढील दोन महिने नदीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमांची सुरुवात पवना नदीच्या आरतीने करण्यात आली. हे कार्यक्रम 21 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहेत.

मंदिरांतर्फे पवना नदीची पूजा आणि झुलेलाल भगवान यांची आरती करण्यात आली. त्यानंतर जलदिंडी प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉ. विश्वास येवले यांचे नदी विषयावर व्याख्यान झाले. डॉ. येवले आपल्या व्याख्यानात म्हणाले, “मानवी संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला आहे. मानवी सभ्यता आणि त्यातील स्थित्यंतरे नदीच्या तीरावर झाली आहेत. त्यामुळे नदीला मानवी जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. हे नदीचे स्थान कायम अबाधित ठेवायला हवे. नदी समृद्ध झाली तर मानवी जीवन देखील समृद्ध होईल.”

नागरिकांची नदीशी नाळ जोडली जावी. नदीचे पावित्र्य जपले जावे. यासाठी हा आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब काळे यांनी केले. आभार जवाहर कोटवानी यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.