Chinchwad News : गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी तसेच शहराच्या सुरक्षेसाठी सामाजिक संस्था लावणार हातभार – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या प्रवृत्तीवर घाव घालणे गरजेचे आहे. गुन्हेगारीची प्रवृत्ती संपली तर गुन्हेगारी आपोआप संपेल. यासाठी कनेक्टिंग एनजीओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सामाजिक संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले. त्याला सामाजिक संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शुक्रवारी (दि. 23) पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सामाजिक संस्था, कार्पोरेट अधिकारी यांच्यासोबत वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. या वेबिनारसाठी 100 जण उपस्थित होते. पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या माध्यमातून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप आणि पोलिसांच्या विविध उपक्रमातील पोलीस आणि डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे. त्यातून नवीन संकल्पनांना बळ दिले जाणार आहे.

‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ ही संकल्पना मुंबई पोलिसांच्या मॅन्युअलमध्ये आहे. ती पिंपरी चिंचवड शहरात राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत दररोज एका पथकाने आपापल्या परिसरात गस्त घालायची. दररोज वेगळे पथक गस्त घालेल.

एक पथक आठवड्यातून एकच दिवस गस्त घालेल, अशी ही संकल्पना आहे. ही संकल्पना राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यासाठी सामाजिक संस्थांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

शहरात अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याचे प्रमाण बरेच आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.

अशा मुलांना मार्गदर्शन, रोजगाराची उपलब्धता वाढवून प्रशिक्षण देऊन मानसिक परिवर्तन करायला हवे, असे आयुक्तांनी मत मांडले. त्यासाठी देखील सामाजिक संस्था आणि कार्पोरेट कंपन्या पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन या वेबिनारमध्ये देण्यात आले आहे.  तुषार शिंदे आणि राजीव भावसार यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत भावसर यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय अविनाश चिलेकर यांनी करून दिला. सूर्यकांत मुथीयान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.