Chinchwad News : चिखली, तळेगाव एमआयडीसी येथे सामाजिक सुरक्षा पथकाची छापेमारी

2 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चिखली येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई केली. तर तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलवर छापा मारून बेकायदेशीरपणे विकली जाणारी दारू पकडली. दोन वेगवेगळ्या कारवाईत पावणे तीन लाखांचा मुद्देदेमाल हस्तगत केला. ही कारवाई सोमवारी (दि. 1) करण्यात आली.

पहिल्या कारवाईत जाधववाडी चिखली येथे चेतन जाधव यांच्या रूममध्ये प्रतिबंधित गुटखा साठवल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता गुटखासाठा मिळून आला. या प्रकरणी तोयाराम ऊर्फ दिनेश चोराराम चोधरी (वय 20, रा . साईसृष्टी अपार्टमेंट , जाधववाडी) चिखली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 4 हजार 994 रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, 5 हजार 330 रुपये रोख रक्कम, 35 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल 58 हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी असा 2 लाख 3 हजार 294 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाईत तळेगाव चाकण रस्त्यावर इंदोरी फाटा येथील हॉटेल मल्हार व्हेज नॉनव्हेजमध्ये बेकायदा मद्य साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. हॉटेलमधून 33 हजार 669, देशी व विदेशी दारुच्या व बियरच्या 235 बाटल्या, 28 हजार 710 रुपये रोख 18 हजारांचे दोन मोबाईल असा एकूण 80 हजार 379 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या प्रकरणी अभिषेक बाबाजी येवले (वय 21, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, इंदोरी) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 2 लाख 83 हजार 673 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके , कर्मचारी, संदिप गवारी, संतोष वर्ग, पोहवा सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, विष्णु भारती, दिपक शिरसाट, मारुती जाधव, सोनाली माने, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.