Solapur News : धक्कादायक ! कोरोनाचा बिमोड करण्यासाठी चक्क ‘कोरोना देवी’ची स्थापना

कोरोना देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी कोंबडं आणि बोकडाचा बळी देवून तिचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना नावाच्या जीवघेण्या विषाणूने सर्व जगात थैमान घातले आहे. आठ महिने उलटले तरी अद्याप या विषाणूचा खात्मा करण्यासाठी प्रभावी लस निर्माण झाली नाही. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात कोरोनाचा बिमोड करण्यासाठी चक्क ‘कोरोना देवी’ची स्थापना करून त्याचे पूजन करण्यात आले. एवढंच नाही तर कोरोना देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी कोंबडं आणि बोकडाचा बळी देवून तिचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका वृत्तवाहिनेने दिलेल्या बातमीनुसार, बार्शी शहरातील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे.

घराबाहेर फरशीचा छोटासा ओटा तयार करण्यात आला आहे. त्यावर एक दगड ठेवून तर आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देऊळ बांधण्यात आलं आहे. तसेच एका महिलेनं देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना केली आहे.

कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितल. देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

बार्शीतील पारधी समाजानं 21 व्या शतकात देखील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन केल्याने त्यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे उघड झालं आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. माणसाचं मन भावनिकतेने विचार करतं. त्यातूनच हे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धा आणि अफवांना बळी न पडता स्वतः योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण कोरोना इतकीच अंधश्रद्धेची महामारी देखील घातक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.