Solapur : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थंकर यांच्या पत्नी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थंकर (65) यांचे आज (मंगळवारी) निधन झाले आहे. सकाळी 11.45 वाजता सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अर्धांगवायूचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

अपर्णाताई यांना ‘नानी’ या नावाने ओळखलं जातं होतं. त्या 2001 पासून सामाजिक कार्यात कार्यरत होत्या. 2008 पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे त्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होत्या. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. या शिवाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी अनेक वर्षे त्यांनी कार्य केलं.

स्वतः वकील असणाऱ्या अपर्णाताईंना कायद्याचे सखोल ज्ञान होते. त्यांनी कित्येक जोडप्यांचे समुपदेशन करून संसार तुटण्यापासून वाचवले आहेत. समाजसेवेचा वसा घेतलेल्या अपर्णाताईंचे अकाली निधन झाल्यामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.