Solar Village : मावळ तालुक्यातील पुसाणे ठरले सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पुसाणे गावाला (Solar Village) सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव म्हणून मान मिळाला आहे. या गावामध्ये भव्य-दिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प कार्यान्वित होऊन त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यामुळे पुसाणे गावाची विजेची समस्या पूर्णपणे सुटणार आहे. या प्रकल्पासाठी 2 कोटी 60 लाख रूपये खर्च आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, गावचे सरपंच संजय आवंढे यांच्या प्रयत्नांतून व एमटीयू इंडिया कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात आला.

त्याचा लोकार्पण सोहळा कंपनीच्या जर्मनी येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मिशेल लिऊ, टोबियास ऑस्टरमेलर, जिओव्हानी स्पाडारो, भारतातील व्यवस्थापकीय संचालक जी एस सेल्विन यांच्या उपस्थितीत पार पडला.

ग्रामस्थांच्यावतीने परदेशी पाहुण्यांची यावेळी ढोल ताशाच्या गजरात सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांच्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावले.

या प्रकल्पापासून रोजची 40 किलोवॅट विजनिर्मिती होणार असून त्यामुळे गावातील रस्त्यावरील लाईट, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदीरे, गावाला पाणीपुरवठा करणा-या उपसा योजनेच्या मोटारींसाठी 24 तास वीजपुरवठा होणार आहे.

भविष्यात संपूर्ण गावातील कुटुंबांनाही वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सोलर सिस्टीम यंत्रणा उभी करण्यासाठी 20 लाख रुपये खर्च केले तर एमटीयू कंपनीने यासाठी 2 कोटी 40 लाख रुपये खर्च केले आहेत.

यामध्ये केवळ सोलर सिस्टीमच नाही तर बॅटरी बॅकअप, (Solar Village) आणि जनरेटर बॅकअप देखील या सोलर सिस्टीम प्रकल्पाला देण्यात आला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा विजपुरवठा सुरळीत राहणार असल्याने विजे अभावी पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून तसेच विद्यार्थी सुध्दा अभ्यासापासुन वंचित राहणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पासाठी माजी सरपंच धनाजी वाजे, पोपट वाजे, शशिकांत वाजे, गोरख रावडे व पुसाणे ग्रामस्थांचे योगदान लाभले.

सिंगापूर, इटली व जर्मनी येथून आलेल्या पाहुण्यांनी सांगितले की, आम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत केली असून याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. भविष्यात या प्रोजेक्टचा वापर व्यवस्थित झाल्यास गावातही वीज पुरवठा सर्वांना करता येईल, याबाबत विचार करता येईल, असे सांगितले.

MPC News Special : मातीतल्या पारंपारिक खेळात रमले बाल गोपाळ

पुसाणे येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे कार्य मावळ तालुक्यात केल्याचे समाधान किशोर आवारे यांनी व्यक्त केले. सीएसआर फंड राजकीय फायद्यासाठी न वापरता सामाजिक हित जोपासण्यासाठी वापरला जावा, असेही आवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गावचे सरपंच संजय आवंढे म्हणाले की, गावाने 20 लाख रूपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मदत केली. गावाचा विकास हाच सर्वांचा विकास ठरणार असल्याने हा प्रकल्प गावासाठी महत्वाचा ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.