Bhosari : भोसरीतील सोसायटी धारकांच्या नागरी समस्या मार्गी लावा – महेश लांडगे

सोसायटीतील नागरिक, महापालिकेतील अधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज – भोसरी मतदार संघातील अनेक सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. नागरी समस्या त्यांना भेडसावत आहेत. नागरी समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नोटीस दिलेल्या विकसकांनी पुढे कार्यवाही केली की नाही याचा आढावा घेण्यात यावा. जे विकसक दाद देत नसतील त्यांचा बांधकाम परवाना रद्द करण्याचा आदेश देखील लांडगे यांनी दिला.

आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.31)भोसरीतील सोसायट्यांमधील नागरिक आणि महापालिका अधिका-यांची बैठक घेतली. बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, चिखली, मोशी सोसायटी फेडरेशन सरचिटणीस संजीवन सांगळे यांच्यासह विविध सोसाट्यांमधील नागरिक बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बांधकाम व्यावसायिकांनी नोटीसा दिल्यानंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहे की नाही याची माहिती घेतली. ते प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश आमदार लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नव्हती. अशा विकसकांना नोटीसा दिल्या आहेत. नोटीसा दिल्यानंतरही आश्वसनांची पूर्तता न करणा-या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तुमची बांधकाम परवानगी का रद्द करण्यात येऊ नये ? असे पत्र देण्यात यावे. या तक्रारींच्या अनुषंगाने विकसक, आर्किटेक्ट यांना भविष्यात कोणत्याही प्रकल्पास परवानगी देण्यात येऊ नये”

बांधकाम परवानग्या घेतलेल्या विकसकांनी कोणते ना-हरकत (एनओसी)प्रमाणपत्र घेतले आहे. त्याची माहिती घ्यावी. त्याची बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी. त्यांच्या चालू असलेल्या प्रकल्पाच्या बाहेर परवानगी रद्द केल्याचा महापालिकेचा फलक लावण्यात यावा. अधिका-यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी कठोर भूमिका घ्यावी, असेही आमदार लांडगे म्हणाले.

मोशीतील  साई इनक्लेव्ह सोसायटीचे सदस्य वैभवराज निकम, तुषार पाटील म्हणाले, “अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला याचा आम्हाला आनंद आहे. आमदार लांडगे यांनी अधिकारी आणि आमची एकत्रित बैठक घेतली. त्यामुळे आमच्या समस्या अधिका-यांपर्यंत पोहचल्या आहेत. अधिका-यांनी सोसायट्यांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. पाण्याचा प्रश्व वेळेत मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे” .

बो-हाडेवाडीतील  जीवनधारा को-ऑप हौसिंग सहकारी सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब भास्कर, नारायण गव्हाणे, नीलेश पाटील म्हणाले,  आमदार लांडगे यांनी अधिका-यांशी आमची चर्चा घडवून आणली. अधिका-यांनी तक्रारींची तत्काळ दखल घेतली आहे.

चोवीसवाडीतील शुभ अंगण सोसायटी, मोशीतील निसर्ग राघवेंद्र सोसायटी, ग्रीन स्केवअर सोसायटी, साई इनक्लेव्ह सहकारी संस्था, जीवनधारा को-ऑप हौसिंग सहकारी सोसायटी बो-हाडेवाडी, दिघीतील श्री साई मोती कॉम्पलेक्स, भोसरीतील श्री स्वामी समर्थ नगर सोसायटीतील रहिवाशी बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.