Pune : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध समस्या सोडवा – माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील पर्वती मतदार संघातील स्वारगेट पोलीस वसाहतीमधील कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. इमारतींमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने या इमारतीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार तथा भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

या इमारतीभोवती रस्ते डांबरीकरण तसेच ड्रेनेजलाईन टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शहरातील पोस्ट ऑफिस करिता आरक्षित असलेल्या जागांवर पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या जागांवर बांधकाम करण्याकरिता आमदार निधीतूनही निधी खर्च करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे.

विशेष निधी अंतर्गत पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्य शासनाने जो सन २०१९-२० या वर्षाकरिता विकास निधी देण्यात आला आहे, तो वितरित करण्यात यावा, पुणे-सातारा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खेड – शिवापूर येथे जो टोल नाका आहे, त्या ठिकाणी अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. अर्धा ते एक तास नागरिकांना थांबावे लागत आहे. तरी हा टोलनाका बंद करण्यात यावा.

पुणे शहरातील मामलेदार कचेरी येथे हवेली प्रांत ऑफिस पुणे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सार्वननिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खाजगीकरणाच्या माध्यमातून नूतनीकरणाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू असून त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक जागा मोकळ्या असून या जागेवर बांधकाम करण्याकरिता वेगवेगळी आरक्षणे टाकल्यामुळे जागा विकसित करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. तरी आवश्यक असणारे सार्वजनिक हिताचे आरक्षण टाकून जागा विकसित करण्यात यावे तसेच या जागांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

जुनी जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषदेची इमारत असून त्या ठिकाणी स्वच्छतेचे टेंडरची मूदत संपली असल्यामुळे त्या इमारतीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. तरी स्वच्छतेचे टेंडर लावून त्या ठिकाणी स्वच्छता करावी, असेही मिसाळ म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.