Aditya Thackeray : काही गद्दार आज जिल्ह्यात फिरत आहेत, नाव न घेता आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मंगळवारी सायंकाळी पुण्यात जाहीर सभा पार पडली. पुण्यातील कात्रज परिसरात त्यांनी बंडखोर आमदारावर जोरदार हल्ला चढवला. काही गद्दार आज पुणे जिल्ह्यात फिरत आहेत असे म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे एकाच वेळी दोघेही पुणे जिल्ह्याचा दौरा करीत होते. 

 

यावेळी कात्रज येथील जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दार आमदार आणि खासदारांना जनमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. दिल्लीने तुम्हाला नाकारले आहे आतापर्यंत शिवसेना, भगवा ध्वज, उद्धव साहेब यांच्यामुळेच तुम्ही होता. मात्र आता यांनी माणुसकीशी गद्दारी केली आहे. हे गद्दार आमदार, खासदार दिवाळीमध्ये घरी येऊन जेवून गेले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे पहिले ऑपरेशन झाले होते. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर जोरदार हल्ला चढवला.

 

 

दरम्यान कात्रज परिसरात सभेसाठी आल्यानंतर शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांना गराडा घातला होता. तर काहींनी त्यांना हातात हात देण्याचा प्रयत्न केला होता. आदित्य ठाकरे यांनीही सर्व शिवसैनिकांना भेटण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या हातात हात ते देत होते. यावेळी काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली. यावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले मला (Aditya Thackeray) वाटले कोणी माझा हात नेतो की काय पण या हाताने धनुष्यबाण पकडले आहे. गद्दारांना उत्तर देणे इतपत त्यांची लायकी नाही असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला. आज काही गद्दार पुण्यात फिरत आहेत असे म्हणत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.