Jejuri News : यंदा जेजुरीत सोमवती यात्रा रद्द ! 

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबादेवाची यंदाची सोमवती यात्रा व पालखी सोहळा (सोमवारी 14 डिसेंबर) रद्द करण्यात आली आहे. तसेच 12 ते 14 डिसेंबर दरम्यान जेजुरीत जमावबंदी आदेश लागू केला आहे, त्यामुळे भाविकांनी जेजूरीत येऊ नये, असे कळविण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व भक्तांच्या सुरक्षिततेसाठी राज्यसरकारच्या नियमांचे पालन करण्याचा निर्णय मंदिर पुजारी, व्यवस्थापन समिती व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.

दरवर्षी सोमवती अमावस्येला दोन ते तीन लाख भाविक जेजुरीत सोमवती यात्रा व पालखी सोहळ्यासाठी येत असतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील सार्वजनिक यात्रा,जत्रा व ऊरूस रद्द करण्याचे राज्यसरकारचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने यात्रा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु रूढी परंपरेनुसार श्री मल्हार खंडोबादेवाची विधीवत पूजा, अभिषेक सोहळा निवडक पुजारी व भक्तांसमवेत संपन्न केला जाईल, असेही श्री मल्हार मार्तंड देवस्थानकडून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.