Pune News : आईच्या खुनाचा बनाव रचणारा मुलगा प्रेयसीसह गजाआड

एमपीसी न्यूज : प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या आईचा प्रेयसीच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या प्रेयसीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली.

विशाल राम वंजारी (वय 19, रा.माने वस्ती, वढू खुर्द, हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी सुशीला राम वंजारी (वय 38) या महिलेचा खून केला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुशीला वंजारी ही महिला मयत अवस्थेत घरासमोर पडली असल्याची माहिती लोणीकाळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मयत महिलेचा मुलगा विशाल वंजारी याने शिवा देशमुख (जालना) याने पैशाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून केल्या संबंधी फिर्याद दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली असता फिर्यादी विशाल वंजारी याच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता मयत महिलेचा मुलगा विशाल वंजारी यानेच आपल्या प्रेयसी सह हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी विशाल वंजारी आणि नॅन्सी डोंगरे यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सुशीला वंजारी यांचा विरोध होता. याशिवाय आरोपी विशाल वंजारी हा नेहमी घरातील पैसे चोरायचा. आठ मार्च रोजी ही त्याने घरातील पंधरा हजार रुपये चोरले या संशयावरून मायलेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.

यावेळी आरोपी विशाल वंजारे याने प्रेयसीच्या मदतीने रागाच्या भरात आईवर चाकूचे अनेक वार करून खून केला. त्यानंतर ती मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर घराबाहेरील  ओट्याजवळ मृतदेह आणून टाकला. त्यानंतर हा खून दुसऱ्याने केला असल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केली. परंतु लोणी काळभोर पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत हा बनाव उघडकीस आणला आणि दोघांनाही अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.