Micky Mouse Roti for Mom:आईसाठी रिशिवनं बनवली ‘मिकी माऊस रोटी’!

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना त्यांच्या सात वर्षीय मुलाकडून अनोख्या प्रेमाची भेट

एमपीसी न्यूज – दिवसभराच्या तणावपूर्ण कामाने थकून-भागून ती रात्री दहा वाजता घरी पोहचली आणि तिच्या सात वर्षीय लहान मुलाने तिला गोड सरप्राईज दिलं. त्या लहानग्यानं आपल्या आईसाठी स्वतःच्या हातांनी बनविलेली गरमगरम ‘मिकी माऊस’ रोटी दिली… आणि ती माऊली धन्य-धन्य झाली… ती भाग्यवान माऊली म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नाही तर त्या आहेत पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व आघाडीच्या ‘कोरोना योद्धा’ रुबल अग्रवाल! रिशिव अग्रवाल असं​ त्यांचा मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे .

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. या काळात महापालिका अधिकारी- कर्मचारी, आरोग्य विभाग जीवावर उद्धार होऊन काम करीत आहेत. त्यात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल या अग्रेसर आहेत. सकाळी लवकरच घरून बाहेर पडून पुणे महापालिकेत येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कोरोनाच्या काळात सध्या त्यांची बरीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा असो की, कोरोनाच्या आढावा बैठका की, पुणे स्मार्ट सिटी कंट्रोल रुमचे सादरीकरण, प्रत्येकवेळी रुबल अग्रवाल या अभ्यासपूर्ण माहिती देत आहेत. या काळात त्या रात्री उशिरापर्यंत काम करीत असल्याचे सर्वांनाच पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आपण रात्री 10 वाजता घरी पोहोचल्यानंतर रिशिवने आपल्यासाठी खास ‘मिकी माऊस रोटी’ बनवून एक गोड सरप्राईज दिलं, असं ट्वीट रुबल अग्रवाल यांनी केलं आहे. त्यासोबत त्यांनी स्वतःचा व रिशिवचा मिकी माऊस रोटीबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.

अग्रवाल यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले. कोरोना काळात पुणेकरांना आपले कुटुंब मानून त्यांचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेत सर्वच महत्वाची खाती त्यांना देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कामाचा 1 वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.

आपली आई कोरोनाविरुद्ध लढत असताना तिची काळजी घ्यायला हवी, हे प्रेमाचे संस्कार या लहान लेकराच्या रक्तातच रुजले आहेत. रुबल अग्रवाल यांचे पती प्रखर अग्रवाल हे इन्फोसिस कंपनीत कामाला असून सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहेत. सगळे वर्क फ्रॉम होम करीत असताना तू का कामासाठी बाहेर जातेस, असा बालसुलभ प्रश्नही या लहानग्याने आईला विचारला होता.

रुबल अग्रवाल या कोरोनाची लढाई लढत असताना त्यांचे पतीच घर संभाळत आहेत. आपल्या पत्नीसाठी ते स्वयंपाकही करतात आणि त्यांचा मुलगा त्यांना मदत करतो. पत्नीला आवडणारे पदार्थ बनवून ते रुबल अग्रवाल यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड ताण-तणावाच्या कामातून घरी आल्यानंतर क्षणात शिणवठा पळवून लावणारा पती आणि मुलगा असा प्रेमळ परिवार रुबल अग्रवाल यांना कामासाठी विलक्षण शक्ती देतो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला भेट दिली. त्यावेळी अग्रवाल यांनी आपल्याकडे कोरोनाचा पूर्ण चार्ट तयार असल्याचे सादरीकरण केले. स्वतः पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच पुणेकरांना जागरूक करण्याचे काम अग्रवाल यांनी केले आहे. जास्तीत जास्त फिल्डवर जाऊन लोकांमधील कोरोनाची भीती घालविण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या या कार्याची शासनानेही दाखल घेतली असून त्यांची आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.