Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी यांचे पत्र, सांगितल्या या गोष्टी करायला

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार हे दलित, वंचित व आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विकासासाठी राज्य सरकारने चतुःसूत्री कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केल्या आहेत.

सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या आधारे अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, विविध विभागातली आरक्षित रिक्त पदे भरली जावीत तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्य़ा शिष्यवृत्ती योजनेचा व्यापक विस्तार केला जावा अशा सूचनाही सोनिया गांधींनी केल्या आहेत.

अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांची मालकी असलेल्या उपक्रमांसाठी सरकारी ठेके आणि योजनांमध्ये आरक्षणाची व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी केल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पत्रकारांना दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही वंचित, दलित व आदिवासींच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही पाटील यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.