Sonu Sood on Meeting with CM : सोनू सूदच्या मातोश्री भेटीदरम्यान झाला ‘हा’ खुलासा  

Sonu Sood on Meeting with CM: This was revealed during Sonu Sood's Matoshri visit पंतप्रधान मोदी यांचा चाहता असल्याचे मान्य करीत भाजप प्रवेशाच्या शक्यतेचा केला इन्कार

एमपीसी न्यूज – स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केल्यामुळे लोकांच्या मनात वेगळे स्थान मिळवणा-या अभिनेता सोनू सूदवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात टीका करण्यात आली.  त्यामुळे वेगळेच राजकारण तापले. मात्र यानंतर सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

यावेळी त्याच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सोनू सूदने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला की, ‘संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं ते खरं नव्हतं. उद्धवजींनाही हे योग्य नसल्याचं माहिती होतं. ते मला फार आधीपासून ओळखतात. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल एक समज निर्माण केला होता आणि ते लिहिलं होतं’.

पुढे बोलताना सोनू म्हणाला की, ‘महाराष्ट्रात राज्य सरकारच्या मदतीशिवाय मी काहीच करु शकत नाही. जर मी बस किंवा ट्रेनसाठी अर्ज केला तर तो राज्य सरकारच्या मार्फतच जाणार आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्रात काहीच काम केलं नाही असं मी कुठेच बोललेलो नाही. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. मुंबई शहर हाताळणं सोपी गोष्ट नाही. स्थलांतरितांना मदत करण्याची ही माझी पद्धत होती’.

‘पहिल्यात दिवशी मला 50 हजार जणांकडून घऱी पाठवण्याची विनंती आली होती. जेव्हा मी महामार्गावरुन चालत निघालेल्या लोकांशी बोललो तेव्हा ही समस्या किती मोठी आहे याची कल्पना आली. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही मला स्थलांतरितांची मदत करायची असल्याचं सांगितलं’, असं सोनू सूदने सांगितलं आहे.

मात्र असे असतानाही सोनूवर सामनामधून टीका करण्यात आली. त्याविषयी बोलताना सोनू सूदने सांगितलं की, ‘या संपूर्ण वादाची मला काहीच माहिती नव्हती. लोकांनी मला फोन करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अस्लम शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का असं त्यांनी विचारलं. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का असंही विचारल. यावर मी भेटण्यासाठी सहमती दर्शवली’.

भाजपामध्ये प्रवेश करण्याविषयी सुरु असलेल्या चर्चेबद्दल तो म्हणाला, “मी भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माझी राजकारणात प्रवेश करण्याची तसंच कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा नाही. मी एक इंजिनिअर होतो, पण अभिनेता झालो. त्याच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे”,

पण यावेळी त्याने आपण नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं आहे. ‘ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही’, असं सोनूने सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.