Pimpri : विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्र

एमपीसी न्यूज – नवरात्र, दसरा हे सण साजरे करत असताना सामाजिक बांधिलकी जपत दि इन्टरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब्स्‌ (डिस्ट्रिक्‍ट 3234 – डी2) या संस्थेने विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र अमेरिकेहून मागवले आहे. शहरात व आसपासच्या परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अत्याधुनिक यंत्राद्वारे विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. 

‘डोनेशन विथ सेलिब्रेशन’ या संकल्पनेतर्गत खास अमेरिकेहून आयात केलेल्या अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्राचे (आय स्क्रीनिंग मशीन) अनावरण आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे लायन्स क्‍लब माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्‍लब जिल्हा उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, जिल्हा उपप्रांतपाल अभय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे लायन्स क्‍लब विभाग पाचचे अध्यक्ष आनंद मुथा, माजी प्रांतपाल बी.एल.जोशी, विभाग सहाचे अध्यक्ष हेमंत अगरवाल, माजी जिल्हा प्रांतपाल गिरीश मालपाणी, जिल्हा प्रांतपाल रमेश शहा, मुख्य समन्वयक प्रदीप कुलकर्णी, माजी जिल्हा प्रांतपाल राज मुछाल आणि लायन्स क्‍लबच्या सुमारे अडतीस क्‍लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्राचे अनावरण करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना ओमप्रकाश पेठे म्हणाले की, चुकीचा आहार आणि कुपोषण यामुळे शालेय वयातील मुलांमध्ये दृष्टिदोषासहित अन्य तक्रारी उद्भवतात. पालकांची हलाखीची परिस्थिती, पुरेशा वेळेचा अभाव, तसेच नेत्ररोगतज्ज्ञांची फी परवडत नसल्याने मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यासाठी लायन्स क्‍लबने अमेरिकेहून चार लाख दहा हजार रुपये किंमतीचे अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्र आयात केले आहे.

या यंत्राद्वारे केवळ दहा सेकंदात डोळ्यांची तपासणी करून दृष्टिदोषांसह डोळ्यांच्या अन्य गंभीर विकारांसंबंधी छापील निदान केले जाते. पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच अशा अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून लवकरच पिंपरी-चिंचवड, मावळ, चाकण परिसरातील महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची विनामूल्य नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्याचा मानस आहे.

याप्रसंगी प्रदीप कुलकर्णी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल लायन्स क्‍लब आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचे मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच नेत्र तपासणी यंत्रासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या व्यक्‍तींना सन्मानित करण्यात आले. विनय सातपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.