T20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत आपले आव्हान ठेवले जिवंत

आठ गडी राखून केली माजी विजेत्या संघावर दणदणीत मात.

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : ग्रुप अ मधल्या आजच्या आणि एकूण अठराव्या सामन्यात आज विजयश्रीने दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात माळ घालत माजी विजेत्या वेस्ट इंडीजचा पुढचा प्रवास खडतर करताना आपले आव्हान आज तरी जिवंत ठेवले. तब्बल आठ गडी राखून विंडीजवर मोठा विजय मिळवला.

दुबईच्या मैदानावर झालेल्या आजच्या या सामन्यात नाणेफेकी पासून विजयापर्यंत सर्वच अनुकुल गोष्टी साऊथ आफ्रिका संघाच्या बाजूने घडल्या. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने खुपच सावध सुरुवात केली. इतकी की तिसऱ्या षटकाच्या दरम्यान विंडीज कर्णधार पोलार्डला मैदानावर संदेश पाठवावा लागला. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या एविन लेविसने तुफानी हल्ला चढवून आपल्या संघाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने लेंडन सिमोन शब्दशः कुंथत होता. त्याला ना धावा करता येत होत्या ना तो बाद होत होता.

पण लेविसने मात्र आपल्या जबाबदारीला जागत अर्धशतकी खेळी केली खरी पण धावगती वाढवण्याच्या नादात तो वैयक्तिक 56 धावांवर बाद झाला. या धावा त्याने केवळ 35 चेंडूत ठोकल्या होत्या ज्यात तब्बल सहा षटकार आणि तीन चौकार होते,तर सिमोनने इतक्याच चेंडूत केवळ 16 धावा काढल्या होत्या, ज्यामुळे विंडीज संघाची अपेक्षित धावगती खूप दूर होती. साहजिकच धावगती वाढवण्याच्या नादात विंडीज संघाचे खेळाडू दडपणाखाली आले आणि त्यामुळे निर्धारित 20 षटकात केवळ 143 धावाच धावफलकावर लागल्या.

एविन लेविस 56 आणि कर्णधार पोलार्डच्या 25 धावा सोडल्या तर एकही कॅरेबियन फलंदाज आपल्या लौकिकाला न जागल्याने दक्षिण आफ्रिका संघाला केवळ 144 धावांचे लक्ष मिळाले आफ्रिका संघाकडून.प्रेटीरियसने तीन तर केशव महाराजने दोन गडी बाद करत विंडीजवर कायम दडपण ठेवले.

144 धावांचा पाठलाग करताना आफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. हंगामी कर्णधार बाऊमा केवळ दोन धावा करून पहिल्याच षटकात धावबाद झाला. पण याने जराही नाउमेद न होता त्यांनी हॅन्डरीक व व्हॅन डेरडुसेंन या जोडणे 57 धावांची भागीदारी करून संघाला विजयासमीप आणले. हॅन्डरीक 39 धावा काढून अकिलच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मारक्रमने व्हेंदेरसेंनच्या साथीने डावाला गती देत 83 धावांची अखंडीत भागीदारी करून संघाला आठ गडी राखून मोठा विजय मिळवून देत आपल्या संघांचे आव्हान या स्पर्धेत जिवंत ठेवले.तर पहिल्या सामन्यात सपाटून मार खालेल्या विंडीज संघाने आपल्या बेभरवशाच्या खेळाने आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आपल्या साठी कठीण परिस्थिती ओढवून घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.