IND Vs SA 3rd Test Day 4 : दणदणीत पराभव करत आफ्रिका संघाने सामन्यासह जिंकली मालिका 

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – क्रिकेटमध्ये कोणताही संघ हा कधीच कमकुवत वा कायमस्वरूपी मजबूत नसतो, याचे पुन्हा एकदा याची देहा याची डोळा प्रत्यंतर देत मजबूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाकडून पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही जबरदस्त प्रतिकार करत दुसऱ्या कसोटीतल्या विजयाने मालिकेत परतलेल्या यजमान दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला सात गडी राखून दणदणीत पराभूत करत सामना आणि मालिका खिशात घातली.

नवखा पीटर्सन दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत राहिला आणि त्याच्या दोन्हीही डावातील महत्त्वपूर्ण खेळीमुळेच छोट्या धावसंख्या असलेल्या सामन्यात यजमान संघाला वरचढ बाजू मिळवता आली आणि पर्यायाने विजयही.

भारतीय गोलंदाज नक्कीच आपल्या कीर्तीला जागले पण त्यांच्या या चांगल्या कामगिरीला फलंदाजांची योग्य ती साथ न मिळणे, मधल्या फळीतले हमेशाचे अपयश आणि बुमराह, शमीला इतर गोलंदजांची साथ न मिळणे या काही महत्त्वाच्या पण मुख्य बाजू भारतीय संघाला पराभवाच्या खाईत लोटून गेल्या.

आज सकाळपासूनच दक्षिण आफ्रिका फलंदाजी एका खास मनोनिग्रहाने खेळताना दिसली. आज खेळ सुरू होताच किगण पीटर्सनने आपले वैयक्तिक आणि या मालिकेतलेही तिसरे अर्धशतक पूर्ण केले. थोड्याच वेळात त्याचा एक सोपा झेल चेतेश्वर पुजाराच्या हातून सुटला आणि त्याचबरोबर सामनाही! त्याने या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला विजयासमीप आणून सोडले.

शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 82 धावांवर असताना चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टंपवर आदळला आणि त्याची ही खेळी संपुष्टात आली, पण त्याने तोवर संघाला विजयाच्या अगदीच जवळ आणून ठेवले होते. उरलेली औपचारिकता बाऊमा आणि वँनडेरसेनने पूर्ण केली आणि तब्बल सात गडी आणि दीड दिवसाचा खेळ बाकी राखून यजमान संघाने बलाढ्य म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय संघाला धूळ चारली.

पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर मोठमोठे क्रिकेट पंडित भारतीय संघ आपला पहिला मालिका विजय यावेळी हमखास मिळवणार अशा वल्गना करत होते, त्या सर्वांचे दात त्यांच्याच घशात घालत डीन एलगरच्या नवख्या आफ्रिकन संघाने भारतीय संघाला चारीमुंड्या चीत केले आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते, या कित्येक वर्षांपासून कानी पडत असलेल्या वाक्प्रचारावर शिक्कामोर्तब केले आहे. वँनडरसेन 41 तर बाऊमा 32 धावा काढून नाबाद राहिले.

हा पराभव भारतीय संघाला आणि सच्चा क्रिकेट रसिकांना फार वर्षे छळत राहील, यात काहीच शंका नाही. अभूतपूर्व अशी संधी नव्हे सुवर्णसंधी भारतीय संघाला लाभली होती. त्यात तुफानी आग ओकणारे आणि विरोधी संघाच्या 20 विकेट्स सहज मिळवू शकतील, असे आभासी बुमराह, शमी हा तोफखाना सोबत असतानाही ही सुवर्णसंधी भारतीय संघ हातातून घालवून बसला याला कारणीभूत दक्षिण आफ्रिका संघाच्या मजबूत आणि निग्रही खेळाइतकेच भारतीय फलंदाजांचे अपयश आहे.

या मालिकेतल्या पराभवाने आता भारतीय संघाला जागतिक कसोटी कप मध्ये सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे हे नक्की. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धची मायदेशी झालेल्या मालिकेतही केवळ 1 विरुद्ध शून्य अशा फरकाने जिंकला होता त्यामुळे आता अंकतालिकेतही भारतीय संघ खाली घसरला आहे.

विराट कोहलीचे पहिल्या डावात केलेले 72 धावा सोडल्या तर त्याचे अपयश, पुजारा, रहाणे या अनुभवी जोडीला वारंवार अपयशी ठरत असूनही संघात ठेवणे अशी अनेक कारणे पराभवातली मुख्य असतील. दोन्ही डावात जबरदस्त फलंदाजी करून विजयात मोठा वाटा उचलणारा पीटर्सन सामन्याचा मानकरी ठरला, तर झुंजार शतक ठोकणाऱ्या पंतचे चौथे शतक, बुमराहने पहिल्या डावात घेतलेल्या पाच विकेट्स या व्यर्थ ठरल्या.

संक्षिप्त धावफलक –

  • भारत – 223 आणि 198
  • द. आफ्रिका – 210 आणि तीन बाद 212

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.