Special article by Harshal Alpe : आशा की निराशा !!!!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – सध्याची परिस्थिती अशी आहे की, आशा आणि निराशा या दोन्हीमध्ये फरक आहे की नाही हेच कळत नाही. कधी कधी भविष्याबद्दल प्रचंड आशा वाटते, तर दुसर्‍याच क्षणी आपण निराश कसे होतो, हेही कळत नाही. अशावेळी मन स्थिर ठेवण्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी तपासून बघायला लागतो आणि त्यातूनही जर का काही होताना दिसले नाही की पुन्हा निराशा !!!!

आज आपण फार मोठ्या विचित्र परिस्थितीतून जात आहोत. एक अख्खे वर्ष आपण कोरोना नावाच्या रोगाच्या भीतीने घालवले आहे आणि सगळं काही व्यवस्थित होईल, या आशेने हे असलेले नवे वर्ष ही त्याच चिंतेत आणि प्रतीक्षेत घालवत आहोत आणि ही प्रतीक्षा काही संपत नाहीय.

सुरवातीला लस ही एक आशा होती. लस आली की बंधने कमी होतील आणि हळूहळू आपण पूर्ववत जीवन जगायला लागू, या आशेतच जीवन गोड वाटायला लागले. लस आली, पण तरीही बंधने काही कमी झाली नाहीत. काही लो आम्ही लस घेणार नाही असं म्हणणारेही आता लस घ्यायला तयार झाले आहेत.  तरी सुद्धा लॉकडाऊनची भीती काही ओसरायला तयार नाही. ती टांगती तलवार आहेच आहे. सरकार सहज बोलून जाते की, परिस्थिती नियंत्रणात नाही आली तर बंद करावं लागेल, पण! लोकांचा आणि पोटाचा विचार कोण करतं? पोट लॉकडाऊन नाही करता येत हो ! हीच गोष्ट निराश करणारी आहे.

ज्या नाट्यगृहात नाटके होत नाहीत, ज्या नाट्यगृहांच्या जिवावर पोट भागू शकत नाही, संसार उघड्यावर पडण्याची पाळी येते, आज तिथून जाताना जेव्हा तिथे राजकीय पक्षांचे, नेत्यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतले कार्यक्रम बघतो, तेव्हा हा परिस्थितीवरचा राग हतबलतेवरून व्यवस्थेकडेच सरकतो आणि हा राग पक्ष बघत नाही की जात बघत नाही, हा राग बाहेर येण्यासाठी वाट शोधू लागतो आणि मग बेफिकरी वाढते.

याच बेफिकिरीचे उत्तम उदाहरण म्हणजे दुकाने , आस्थापना अमुक वाजता बंद करा, असे आदेश असतानाही चोरी- छुपेपणे, पोलिसांना आणि यंत्रणांना फसवून बिनदिक्कत उघडी ठेवली जातात. तेव्हा तो व्यवस्थेवरचा रागच असतो. जेव्हा सामान्य माणूस “मी या वेळेला मतदानच करणार नाही, कुणीही माझं दु:ख पुसायला आला नाहीये, तर मी का करावं मतदान?” असं विचारतो तेव्हा आमची व्यवस्थाच कोलमडून पडण्याची भीती निश्चितच आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

माय बाप सरकारांनो लॉकडाऊनची धमकी देऊ नका, तर काही तरी उपाय करा. या बंधंनांतून आणि भीतीतून आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. मृत्यूचं भय आम्हाला निश्चितच आहे, पण त्याचबरोबर आम्हाला मोठेही व्हायचे आहे. ही बंधने आमच्या प्रगतीला मारकच ठरत आहेत. कृपा करा आणि ती कमी करा. इतर अनेक मार्ग आहेत तुमच्यासमोर, निश्चित आहेत, पण आम्हाला जगू द्या, एवढीच एक विनंती…

कोरोनाबरोबर जगायचे आहे हे मान्य, पण यात तुम्ही बंधनात आणि लॉकडाऊन करून, मन मारून जगायचे, असे तर म्हणालेले नाही आहात ना? मग आम्हाला का ढकलताय, भीती घालताय? टप्प्याटप्प्याने कमी करा ही बंधने!

आणि आता थांबवा हा आशा-निराशेचा जीवघेणा खेळ …

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.