Police Foundation Day : पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलिस दलाची ‘हिस्ट्री’

एमपीसी न्यूज : (वैभव कातकाडे, नाशिक ) पोलीस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलीस तिथे काहीतरी गडबड आहे.  हे आम्ही देशवासीयांनी मनात पक्के करुन घेतले आहे.

हे पोलीस तेच असतात जे आरोपीकडून गुन्हा कबूल करुन घेतात. हे पोलीस तेच असतात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न ऐरणीवर आल्यावर आपला दंडुका बाहर काढतात. प्रसंगी आपल्या प्राणांचीही पर्वा करत नाही. यांना कौटुंबिक जीवन नसते कारण महाराष्ट्र पोलीस यांचे ब्रिदवाक्यच आहे… सद्रक्षणाय खलनिग्रहणाय!

अशा या पोलीस दलाचा आज स्थापना दिन. या दिनाचा इतिहासही रंजकच आहे. मुंबई पोलीस दलाची निर्मितीची कहाणी फारच रंजक आहे. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी 1672 पासून रक्षक नेमले गेले. भंडारी ब्रिगेड नावाची ही फौज 17 फेब्रुवारी 1779 मध्ये अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलीस दल निर्माण झाले.

पुढे महाराष्ट्र पोलीस दल 2 जानेवारी 1961 रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलीस दलाचा स्थापना दिन.  महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून हा ‘स्थापना दिन’ साजरा होतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या अखत्यारीतील पोलीस जनतेवर अन्याय अत्याचार करीत. स्वातंत्र्यानंतर पोलीस दलात बरेच बदल झाले, तरी आजही त्यांच्याबद्दल फारसे कोणी चांगले बोलत नाही. यासंबंधी फ. मुं. शिंदे यांची ‘पोलिस नावाचा माणूस’ ही बोलकी कविता आहे. त्यात पोलिसांची व्यथा त्यांनी मांडली आहे. पोलीस दलाचे ऋण फेडण्यासाठी एकदा तरी पोलीस म्हणून जन्म घ्यावा लागेल. कारण पोलीस म्हणून जगत असताना स्वतः आणि समाज वेगळा नसतोच. त्यात वेळ प्रसंगी समाजासोबतही दोन हात करावे लागतात.

दिवाळी दसरा गणपती हे सण उत्सव तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना…पोलिसांना फक्त एकच सण…कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण …त्यांच्या अंगावरची वर्दी कोणीही एरागबाळा चढवू शकत नाही ती वर्दी अंगावर चढवण्याची पात्रता फक्त त्याच्याच अंगी असते जो त्याग करण्यास सदैव तयार असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.