Chinchwad : गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना सकारात्मक दिशा देणार ‘विशेष बाल पोलीस पथक’

विशेष बाल पोलीस पथकाची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

एमपीसी न्यूज – गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथका’ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी (दि. 13) ऑटो क्लस्टर येथे पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष बाल पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथील बाल न्याय प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जैद सय्यद, बाल सुरक्षा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय बावीस्कर, मोरवाडी प्रथमवर्ग न्यायालयातील अॅड. मोरे आदींनी उपस्थितांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर ‘विशेष बाल पोलीस पथक’ स्थापन करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन स्तरावरील या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी आणि किमान तीन पोलीस कर्मचारी असणार आहेत. या पथकांचे नियंत्रण प्रमुख म्हणून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या पथकांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा चिंचवड मधील ऑटो क्लस्टर येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये आयुक्तालयातील 15 पोलीस अधिकारी आणि 45 कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “एक पोलीस म्हणून आपल्या सर्वांना समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली आहे. पोलीस स्टेशन स्तरावर नव्हे तर समाजातील इतर ठिकाणी देखील बालकांच्या मदतीस तत्पर असाच आपला दृष्टिकोन असायला हवा. या पथकात काम करत असताना एखाद्या बालकास देखील गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करून त्याला सकारात्मक ऊर्जा देता आली तर ती आपल्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी असेल. नजरचुकीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संपर्कात आलेली झोपडपट्टी परिसरातील व व्यसनाधीनतेकडे वळालेल्या बालकांना या पथकाने समुपदेशन करावे. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करावे. रोजगार मेळाव्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले. तर सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस फौजदार गंगाधर नाईकरे, पोलीस कर्मचारी कैलास बोबडे, संतोष बर्गे, राजेश परंडवाल, सुधा टोके, संजय भोसले, नम्रता सकट यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.