Special Editorial : विशेष संपादकीय – कोरोनाची लढाई आणि बाजारबुणगे

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) : अवघ्या दोन-तीन महिन्यांत संपेल, असे वाटणारी कोरोना विषाणू विरुद्धची लढाई सव्वा वर्ष होऊन गेले तरी संपलेली नाही, कधी संपेल माहीत नाही. प्रारंभी किरकोळ वाटणारा शत्रू माणसाच्या चिकाटीची खरीखुरी परीक्षा घेत आहे. शत्रू वेगवेगळ्या रुपात, वेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या क्षमतेने हल्ले करीत असल्यामुळे माणूस लढत असला तरी पुरता हैराण झाला आहे. 

कोरोनाची लढाई संपली असे वाटून माणूस गाफील झाला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हल्ला झाला. या लाटेमध्ये कोरोनाने मानवजातीची मोठी हानी केली. ही हानी केवळ जीविताचीच नाही तर माणसाचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. स्वतःच्या बुद्धीवर घमेंड असणाऱ्या माणसाला जमिनीवर आणण्याचे काम या अतिसूक्ष्म वाटणाऱ्या विषाणूने केले आहे.

प्रारंभी या विषाणूवरील प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती, कोणत्याही प्रकारची खात्रीशीर उपचारपद्धती किंवा औषध उपलब्ध नव्हते. भारतासारख्या देशात तर अशा महामारीविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणाही नव्हती. गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. आपण कोरोना विरुद्ध निकराचा लढा देत असलो तरी नेमकं कुठे कमी पडतोय, याचा विचार करण्याची नीतांत गरज आहे.

पानिपतचे युद्ध 

पानिपतच्या युद्धात महापराक्रमी अशा मराठा सैन्याचा पराभव होण्यामागील कारणांमध्ये सैन्यासोबतच्या बाजारबुणग्यांचा अनावश्यक ताण हे एक महत्त्वाचे कारण होते. बाजारबुणगे म्हणजे सैन्यासोबत व्यापार-धंद्याचा उद्देश ठेवून वावरणारी मंडळी, बायका-मुले असा लवाजामा. या बाजारबुणग्यांमुळे सैन्याच्या हालचालींचा वेग मंदावतो आणि रणनीती चुकत जाते. कितीही रसद मिळाली तरी ती अपुरी पडते. सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सैन्याचे ‘पानिपत’ होते. इतिहासातून आपण योग्य धडा घेतला पाहिजे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याकडे रथी, महारथी, सैनिक सर्वकाही आहे, पण त्याबरोबरच बाजारबुणग्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, ही बाब दुर्दैवी आहे. रणांगणावर बाजार मांडल्यानंतर रथी, महारथींनी तरी काय करायचे?  या बाजारबुणग्यांमुळेच ही लढाई दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. लढाई जिंकली तरच बाजारबुणगेही वाचणार आहेत. त्यांच्या तात्पुरत्या फायद्यासाठी ते स्वतःबरोबरच संपूर्ण सैन्याचा जीव धोक्यात घालत आहेत. ही लढाई जिंकायची असेल तर बाजारबुणगे कमी करून सैनिक वाढविण्याची गरज आहे.

प्रत्येकाने या लढाईत योगदान दिले तर आपण ही लढाई लवकर जिंकू यात शंका बाळगण्याचे कारण नाही. आता आपण बाजारबुणगे होऊन मानवजातीचे पानिपत घडवायचं की सैनिक होऊन कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी  योगदान द्यायचे. हे ठरविण्याची वेळ आली आहे.

कोरोना बाधितांपैकी 85 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे

आतापर्यंत जगातील 15 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 कोटी 85 लाख रुग्णांनी म्हणजेच 85 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 31 लाख 79 हजार 474  म्हणजेच 2.11 टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जगात सुमारे एक कोटी 41 लाख सक्रिय रुग्ण आहे. हे प्रमाण 12.83 टक्के आहे. जगाची एकूण 786 कोटी लोकसंख्या लक्षात घेतली तर जेमतेम 1.91 टक्के म्हणजेच दोन टक्क्यांपेक्षाही कमी लोकांपर्यंत कोरोना विषाणू पोहोचला आहे.

जागतिक लोकसंख्येपैकी 0.24 टक्के म्हणजे अवघा पाव टक्का सक्रिय रुग्ण आहेत. भारताच्या सुमारे 139 कोटी लोकसंख्येपैकी 1.32 टक्के नागरिकांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला आहे. ही आकडेवारी पाहिली तर कोरोनाचे संकट किरकोळ असल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर नजर टाकूयात. पुणे शहरात आतापर्यंत 4 लाख 15 हजार 399 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 3 लाख 64 हजार 464 म्हणजेच जवळजवळ 88 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 2 लाख 8 हजार 417 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 1 लाख 83 हजार 86 म्हणजेच सुमारे 88 टक्के रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

पुण्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 732 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 4 हजार 262 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 1.62 टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये तो 2.04 टक्के आहे. जागतिक व भारताच्या सरासरीपेक्षाही तो मर्यादित आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे.

धडकी भरवणारे मृत्यू तांडव

टक्केवारीचा विचार करता, आकडा लहान असेल तेव्हा जास्त टक्केवारी देखील कमी वाटते, मात्र आकडा मोठा असेल तर लहान टक्केवारी देखील मोठी वाटते. कोरोनाच्या बाबतीतही तेच झाले आहे. आधी मृत्यूदर जास्त होता, मात्र बाधितांची संख्या कमी होती. आता मृत्यूदर कमी आहे, मात्र बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही छातीत धस्स करणारा आहे. मृत्यू लांब असतो, तेव्हा आपण बेफिकीर असतो, मात्र मृत्यू जवळ येतो, तेव्हा भले-भले घाबरतात. मृत्यूदर कमी असल्याबद्दल खोटा आनंद मानणे म्हणजे स्वतःची समजूत काढण्यासारखे आहे.

प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. स्वतःवर वेळ येते किंवा आपल्या प्रियजनांवर वेळ येते, तेव्हा मृत्यूची खरी भयानकता जाणवते. दिवसाला शहरात नव्वद पेक्षा अधिक कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीत एकावेळी आठ-दहा शववाहिका अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभ्या असल्याचे दृष्य भयावह आणि मन पिळवटून टाकणारे आहे.

सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे ती, जिवाच्या आकांताने सुरू असलेली ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन सिलिंडर्सची शोधाशोध! कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा, लसीकरण केंद्रांवरील गर्दी आणि रांगा. सर्व काही मन सुन्न करणारे! लढाई म्हटलं की या गोष्टी घडतातच, पण लोकांचा खरा संताप होत आहे तो बाजारबुणग्यांनी या लढाईत मांडलेल्या काळ्या बाजाराने! या लढाईत माणुसकीचे दर्शन घडतंय, त्याच प्रमाणे जीवनाची लढाई लढणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना खिंडीत गाठून लुबाडणाऱ्या अमानुषतेने मन उद्विग्न होत आहे.

कोरोना विरुध्द लढाई जिंकण्यासाठी…

हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे. आतापर्यंत काय चुकले, कोणाचे चुकले हे उगाळत बसण्याऐवजी, काय सुधारता येईल, याचा विचार करूयात! प्रत्येक व्यक्तीने, शासकीय-निमशासकीय-खासगी संस्थांनी या लढाईत सैनिक म्हणून सहभागी झाले पाहिजे. लढाई जिंकण्यासाठी आवश्यक त्या किमान शिस्तीचे पालन केले पाहिजे. एवढे केले तरी अवघड वाटणारी लढाई सोपी होत जाणार आहे. मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझर यांचा वापर प्रत्येकाने स्वतःसाठी सक्तीचा केला पाहिजे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. कोरोना विरुद्ध लढताना नवीन रुग्णांची भर पडू न देणे फार महत्त्वाचे आहे.

कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे, चाचणी करून घेणे, आवश्यक असेल तर गृह विलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल होण्याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. डॉक्टरांनीही रुग्णाला अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात दाखल करून घ्यावे, अत्यावश्यक असेल  तेवढीच औषध व वैद्यकीय उपचार द्यावेत. उपलब्ध औषधे आणि साधनसामग्रीचा काटकसरीने वापर केला तरच ते खऱ्या गरजूंना मिळून जीवितहानी टाळणे किंवा किमान पातळीवर आणणे शक्य होऊ शकते.

हे सर्व सुरू असतानाच कोरोनाची  तिसरी व चौथी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून नेमके नियोजन करावे लागणार आहे. कोरोना विषाणूची बदलणारी रचना, रुप, वाढती घातकता लक्षात घ्यावी लागणार आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवावी लागणार आहे. लशींचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. त्या बरोबरच लसीची नासाडी होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

वैद्यकीय यंत्रणा अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने शासकीय-निमशासकीय संस्थांच्या बरोबर खासगी संस्था, सेवाभावी संस्था, उद्योग तसेच वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. विषाणू विरुद्ध माणुसकीचा विजय हा आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी म्हणण्यापेक्षा अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आपण प्रत्येकजण कोरोनाच्या लढाईतील सैनिक बनूयात, ही लढाई लवकरात लवकर जिंकूयात! पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊयात!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.