Pune : पुण्यात सत्कार होणे म्हणजे संस्कृती-परंपरेत पोहण्याचा भास – पंडित जसराज

कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात पंडित जसराज यांचा विशेष सन्मान

एमपीसी न्यूज – नासा नंतर हा पहिलाच पुरस्कार आहे. पुण्यात सत्कार होणे म्हणजे सांस्कृतिक नगरीने दाद देण्यासारखे आहे. येथे सत्कार होणे आपण संस्कृती – परंपरेत पोहत असल्याचा भास होतो. कोथरूडने माझा सन्मान केला. हे माझा आनंद द्विगुणीत करणारे आहे, असे उद्गार याप्रसंगी पंडित जसराज यांनी काढले.

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १० व्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना वयाची ९० वर्ष पूर्ण  झाल्याबद्दल आणि त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच  ‘नासा’ने एका नव संशोधित ग्रहाला त्यांचे नाव दिल्याचे औचित्य साधत पं. जसराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० वा कोथरूड सांस्कृतिक महोत्सव पुणे येथे सुरु आहे. महोत्सवाचे उद्घाटन संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. ज्येष्ठ बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते पं. जसराज यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने शास्त्रिय गायक पं. सुहास व्यास यांना ‘संस्कृती कला जीवनगौरव पुरस्कार’ आणि तबला वादक पं. विजय घाटे यांना ‘संस्कृती कला गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचे सरोद वादन पार पडले. सरोदच्या झंकाराने वातावरणात नवचैतन्य संचारले होते. नंतर उस्ताद तौफिक कुरेशी व त्यांचे पुत्र शिखर कुरेशी यांचे जेंबे वादन झाले. त्यांनी तीन तालाने वादनाची सुरुवात केली. त्यांना तन्मय देवचक्के यांनी हार्मोनियमची साथसंगत केली. प्रसिद्ध पार्श्वगायक व गझल गायक हरिहरन यांनी बहारदार ‘लाईव्ह गजल्स’ सादर केल्या. कार्यक्रमात आज ३ फेब्रुवारी  राम कृष्ण मठ यांच्यातर्फे युगपुरुष स्वामी विवेकानंद हे महानाट्य सादर होणार आहे तसेच उद्या ४ फेब्रुवारी चला हवा येऊ द्या कार्यक्रम सादर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.