Shri Krishna Janmashtami: माखनचोर, नंदकिशोर, मनमोहन, घनश्याम…

Special story on the actors who played the role of Lord Krishna On the occasion of Shri Krishna Janmashtami भगवान श्रीकृष्ण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मिश्किल हास्य, डोक्यावर मोरपीसाचा मुकूट, ओठांवर बासरी आणि देखणा पुरुषोत्तम.

एमपीसी न्यूज – आज (दि.11) श्रीकृष्णजन्माष्टमी नटखट नंदलाल, गोपींचा कान्हा, अर्जुनाचा सखा, द्रौपदीचा जिवलग बंधू, ते गीता सांगणा-या भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कृष्णाचे वास्तव्य जिथे होते त्या मथुरेत आणि वृंदावनात तर जन्माष्टमी उत्साह अलोट असतो.

भगवान श्रीकृष्ण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मिश्किल हास्य, डोक्यावर मोरपीसाचा मुकूट, ओठांवर बासरी आणि देखणा पुरुषोत्तम. चित्रपटसृष्टीत आणि मालिकांच्या जगात आजवर अनेकांनी श्रीकृष्णाची भूमिका वठवली. चित्रपटसृष्टीतील सगळ्यात पहिला कृष्ण कोण असे विचारले तर ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांचेच नाव घ्यावे लागेल.

आजच्या तरुण पिढीला हे नाव देखील कदाचित माहीत नसेल. पण जुन्या पिढीतील लोकांच्या समोर शाहू मोडक म्हणजे कृष्ण हे समीकरण फिट्ट बसलेले आहे. ते इतके हुबेहूब कृष्ण दिसत की, खरा श्रीकृष्ण आला तरी तो देखील विचारात पडेल. त्यानंतर मराठीत राम मराठे या ज्येष्ठ नटवर्यांनी कृष्ण चित्रपटात आणि संगीत नाटकात देखील समर्थपणे साकारला.

पुढे सचिन पिळगावकर या आणखी एका देखण्या नटाने गोपालकृष्ण याच नावाच्या हिंदी चित्रपटात श्रीकृष्ण यथार्थपणे साकारला. मालिकांचे जग सुरु झाल्यावर मात्र महाभारत या मालिकेतील नितीश भारद्वाज यांनी साकारलेला प्रगल्भ कृष्ण सगळ्यांना भावला.

त्यावेळी ते 23 वर्षांचे होते. नितीश यांनी मराठी, हिंदी चित्रपटात नायकांच्या भूमिका देखील साकारल्या. पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती कृष्णामुळेच.

नितीश भारद्वाज यांच्या नंतर आणखी एका नटखट बालकलाकाराने कृष्णाच्या भूमिकेवर आपली अमीट छाप टाकली. स्वप्निल जोशी याने रामानंद सागर यांच्या श्री कृष्णामध्ये युवा कृष्ण साकारला. तो सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलाकार म्हणून ओळखला जातो.

सर्वदमन बॅनर्जी या आणखी एका कलाकाराने श्री कृष्णामध्ये मोठा कृष्ण साकारला होता. त्याने त्यानंतर अर्जुन’, ‘जय गंगा मैया’ आणि ‘ओम नम: शिवाय’ या मालिकेत देखील कृष्णाची भूमिका केली होती. सध्या सर्वदमन ऋषीकेश येथे योग शिकवण्याचे काम करत असून त्यांनी मनोरंजन सृष्टीला अलविदा केला आहे.

सर्वदमन बॅनर्जी

सौरभ राज जैन या कलाकाराने 2013 मध्ये बनलेल्या महाभारतमध्ये कृष्णाची भूमिका केली होती. त्याशिवाय त्याचे अनेक मालिकांमध्ये कृष्ण आणि विष्णूचे रोल केले आहेत.

सौरभ राज जैन

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या विशाल करवाल या युवा अभिनेत्याने द्वारकाधीश या मालिकेत कृष्णाची भूमिका केली. तसेच त्याने परमावतारमध्ये देखील कृष्ण रंगवला.

विशाल करवाल

बालकलाकार धृती भाटिया हिने जय श्रीकृष्णामध्ये छोट्या कृष्णाची भूमिका केली. याशिवाय सध्या सुरु असलेल्या मालिकेत सुमेध मुदगलकर युवा कृष्ण साकारत आहे. तसेच रजनीश दुग्गल या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकाराने देखी कृष्ण साकारला आहे.

या सगळ्या कृष्णांच्या व्यक्तिरेखांचा आढावा घेताना एक रंजक गोष्ट समोर आली. सध्या माझ्या नव-याची बायको या मालिकेत आनंदची भूमिका साकारत असणा-या गोलमटोल मिहिर राजदाने चक्क स्वप्निल जोशी सोबत सुदामा साकारला होता. सध्याचा गोलमटोल आनंद आणि तेव्हाचा काडी पैलवान सुदामा यांचा आत्ता कुठेच मेळ बसत नाही.

मिहिर राजदा सुदामाच्या भूमिकेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.