Pune : शहराच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प असलेल्या नदीसुधार, जायका आदींसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती द्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. या प्रकल्पांना गती देण्यासाठी ज्या काय अडचणी येत आहेत, त्या त्वरीत मला कळवा, त्याची सोडवणूक केली जाईल, असेही आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्‍यांना दिले आहे. 

_MPC_DIR_MPU_II

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिवसभर पुणे शहरात होते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी महापालिकेतील पदाधिकार्‍यांशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी प्रामुख्याने शहरातील नदीसुधार आणि जायका प्रकल्प मार्गी लावण्याच्या आणि त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी महापौैर मुक्ता टिळक यांनी पालिकेतील भरतीसंदर्भात राज्य शासनाने घातलेली बंदी उठवावी आणि पालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील भरती करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावेळी सातवा वेतन आयोगाचा विचार करून राज्यातील महापालिकांना काही पदे भरण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले.

तसेच सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी जायका आणि नदी सुधार प्रकल्पाच्या प्रलंबीत फायली पास करण्याची आणि महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या ग्रेड पे चा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोनी प्रकल्पांना गती देण्याच्या आणि अडलेली कामे त्वरीत कानावर घालण्याच्या सूचना केल्याचे भिमाले यांनी सांगितले. तर ग्रेड पे च्या संदर्भात मुंबईत बैठक बोलावण्यात येणार असल्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भिमाले यांनी सांगितले. दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी एचसीएमटीआर मार्गासंदर्भात माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1