Talegaon Dabhade: सलग तिसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to public curfew on Consecutive third day in Talegaon Dabhade शहरातील रिक्षा बंद होत्या. त्यामुळे मुख्य रस्त्यावरही तुरळक वाहने धावताना दिसत होती.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कर्फ्यूला आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता तळेगाव शहर 100 टक्के बंद आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भावाला आळा बसावा म्हणून ग्रामस्थांनी (दि.29) रोजी तळेगाव स्टेशन येथील श्री मारूती मंदिर तसेच गावभागातील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात ग्रामस्थ व व्यापारी यांची बैठक झाली होती.

त्या बैठकीत दि. 1 जुलै ते 3 जुलै असा सलग तीन दिवस तळेगाव शहर आणि तळेगाव स्टेशन भाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या जनता कर्फ्यूला बुधवार दि. 1 व गुरूवार दि. 2 जुलै प्रमाणेच आज 3 जुलैला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील रिक्षा बंद होत्या. त्यामुळे मुख्य रस्त्यावरही तुरळक वाहने धावताना दिसत होती.

पानटपरीसह सर्व दुकाने बंद असल्याने तळेगाव शहरासह मुख्य चौक आणि बाजारपेठेत शुकशुकाट होता. नगरपरिषद, बँका आणि शासकीय कार्यालये चालू होती. मात्र लोकांअभावी त्या ठिकाणी शांतता होती.

सकाळच्या सत्रात दूध वितरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवेपैकी फक्त औषधांची दुकाने, रुग्णालये सुरू होती. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. तळेगाव शहरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर तळेगाव स्टेशन येथील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.