Pimpri : पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी शाडू माती गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गगनगिरी विश्‍व फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालयात शाडू माती गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. अबालवृद्धांकडून या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत अबालवृद्ध सहभागी झाले.

गणेशमूर्ती तयार करण्याच्या योग्य मार्गदर्शनामुळे अनेकांनी गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला. सुमारे तीन तास कार्यशाळा चालली. यावर्षी शिरूर तालुक्यामध्ये महिला व स्कूलच्या मूलांसाठी तसेच कॉलेजमध्ये शाडू मातीचा गणपती बनवण्याचे शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये, रयत शिक्षण संस्थेचे शाखा जिजाबाई कन्या विद्यालय, तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू खवसरा स्कूल, शिरूर तसेच अनेक स्कूल व कॉलेजमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी फाऊंडेशनच्या गौरी सरोदे, विभावरी इंगळे, शितल नारखेडे, सुलभा धांडे, छाया पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, तुळशीचे रोपे देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.

लहान मुलांना मूर्ती तयार करणे सोपे जावे, यासाठी शाळेत शिकवल्या जाणार्‍या आकारातून मूर्ती साकारण्यात आली. यावेळी सर्कल, स्क्वेअर, सिलेंडर अशा बरोबरच पणतीच्या आकारातून पोट असे प्रकार शिकवले. आपल्या हातून नेमकी कशी मूर्ती घडेल, याची भीती प्रत्येकालाच वाटत होती. त्यामुळे मातीच्या गोळ्यांचे वाटप झाल्यानंतर फाऊंडेशनच्या सभासदांनी सर्वांना मातीच्या एका गोळ्याचे विविध आकार बनवायले लावले.

‘या मातीला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. यामुळे आपली मूर्ती कशी होईल, याची भीतीच प्रशिक्षणार्थींच्या मनातून नाहीशी झाली. आपण बनवलेल्या मूर्तीत भाव असतात. त्याच्याशी आपण नकळत एकरूप होतो. त्यामुळे आपण बनवलेली मूर्ती श्रेष्ठच असते, असेही यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक असते. आपल्या हाताने गणेशाची मूर्ती साकारून तिची स्थापन करण्याचा आनंद सहभागींना अधिक असतो. समाजात या मूर्तींचे घरीच विसर्जन शक्य आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शाडू मातीच्या मूर्ती बनविणे गरजेचे झाले आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्याने पर्यावरण रक्षणासाठी हातभार मिळत आहे.

रेखा भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निश्चय करण्यात आली की, यापुढे मी कधीही प्लॅस्टरच्या मूर्ती घरी आणणार नाही. शाडू मातीच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना मी करेन.  लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. लहान मुले गणपतीची मूर्ती बनविण्यात दंग झाली होती. तर पालक त्यांची मदत करण्यात दंग झाले होते. कोणी माती मळायला मदत करीत होते, तर कोणी आकार देत होते. वर्षा नारखेडे, अशोक भंगाळे, मोहन भोळे, एकनाथ सरोदे,  शकुंतला महामूनी, अलका ढाकणे, भारती राऊत, सुभाष भोसले, आऊ दुरेखा लुटे यांचे संयोजनात मोलाचे सहकार्य लाभले. गणेशमूर्ती बनवण्याची कला या उपक्रमामुळे शिकायला मिळाली. त्यासाठी आम्ही आभारी आहोत, अशा प्रतिक्रिया यावेळी मुलांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.