Pimpri: स्वयंस्फूर्तीने बंद पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

पिंपरीत दिवसभर धरणे आंदोलन; तोडफोड, जाळपोळ करु नका

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने शहरवासियांना गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरीत दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलकांनी तोडफोड, जाळपोळ करु नये. आंदोलन बदनाम होईल, असे कोणतेही कृत्य करु नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला  मारुती भापकर, प्रकाश जाधव, धनाजी येळकर आदी उपस्थित होते. भापकर यांनी सांगितले की, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लहान मोठे व्यापारी, उद्योजक, शाळा, महाविद्यालये यासह विविध क्षेत्रातील सर्वांनी स्वयंस्फूर्तीने  सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या बंद मधून वैद्यकीय सेवांसह इतर आपतकालीन सेवांना वगळण्यात आले आहे.

सकल मराठा समाजासह इतर सर्वच समाजातील नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

…..या आहेत मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या! 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.
शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी.
अरबी समुद्रात शिवस्मारक व्हावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.