Pimpri: क्रीडा समितीला दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध; खर्च मात्र गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य आणि अधिका-यांना दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध लागले आहेत. दौ-याचा खर्च मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. 

महापालिकेच्या क्रीडा समितीची पाक्षिक सभा आज (सोमवारी) पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती संजय नेवाळे होते. या सभेत आयत्यावेळी दिल्ली आणि पतियाळा दौ-याचा ठराव पारित करण्यात आला. या ठरावात म्हटले आहे की, नेहरूनगर येथील महापालिकेचे आण्णासाहेब मगर क्रीडा संकुल मोडकळीस आले आहे. त्याची दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील इतरही काही मैदाने आणि विविध खेळाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने दिल्ली येथील इंद्रप्रस्थ क्रीडा संकुल आणि पतियाळा येथील क्रीडा संकुल यांची पाहणी करणे, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य, प्रशासन अधिकारी, क्रीडा अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित करणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता द्यावी, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.