Sports Mark : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

एमपीसी न्यूज – दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे क्रीडा गुण मिळण्याबाबत क्रीडा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करता येणार आहे. ही क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ राहणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे 12 ते 21 जून पर्यंत प्रस्ताव सादर करायचा आहे. संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे 25 जूनपर्यंत प्रस्ताव / यादी सादर करायचे आहेत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8वी, 9वी मध्ये विद्यार्थ्याचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) विद्यार्थ्यांच्या बाबतीत अकरावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व या विद्यार्थ्यांना 2020-21 साठी गुण देण्यात यावेत, असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.