Pimpri News : खेळाडूंनी शासनाच्या अधिकाधिक सुविधांचा लाभ घ्यावा – क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे

एमपीसी न्यूज – “बदलत्या काळानुसार क्रीडाक्षेत्राचे तंत्रज्ञानही बदलत चाललंय त्यामुळे फिजिओथेरपी, आहार, डोपिंग यासारख्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.तसेच क्रीडा क्षेत्रासाठी शासन देत असलेल्या सुविधांचा अधिकाधिक लाभ खेळाडूंनी उचलून भविष्यात त्यातच आपली रोजगाराची वाट शोधली पाहिजे.,”असे प्रतिपादन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी निगडी येथे केले.

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व पिंपरी चिंचवड क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या मनोहर वाढोकर सभागृहात आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी आपले विचार उपस्थित क्रीडाप्रेमींसमोर केले.यावेळी व्यासपीठावर शिक्षण उपायुक्त संदीप खोत, क्रीडा उपायुक्त विठ्ठल जोशी, प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, मनोज देवळेकर उपस्थित होते.

कसगावडे म्हणाले, “पुणे शहराच्या सावलीत जरी पिंपरी चिंचवड शहर वाढत असलं तरी या शहराने क्रीडा क्षेत्रात आपली ओळख जपली आहे.हॉकीचे पॉलीग्रस मैदान, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीनंतर पिंपरी चिंचवड शहरात पहिली क्रीडा प्रबोधिनी झाली.

एक दिवसीय कार्यशाळेची सुरुवात फिजिओथेरपिस्ट डॉक्टर तारिक शेख यांच्या व्याख्यानाने झाली.”शारीरिक शिक्षणात  फिजिओथेरपीचे महत्व ‘ या विषयावर शेख यांनी खेळाडूंची झोप, आहार, दुखापती  व एकंदरीत त्यांच्या जीवनशैलीचे विवेचन केले.त्यानंतर  दुसऱ्या सत्रात डॉक्टर आरती खोत यांनी ‘शालेय खेळाडूंची बदलती मानसिकता व मानसशास्त्रची गरज’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात गुणवंत क्रीडा शिक्षक व त्यांच्यातील क्रीडा पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यात लक्ष्मण माने, केशव अरगडे, मुकेश पवार, साहेबराव शेळके, राजेंद्र काळोखे, आरती यादव, आरती काळभोर  व मिलिंद संधान यांचा समावेश होता.चांगदेव पिंगळे यांना क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रीडा शिक्षकांमधून झालेले मुख्याध्यापक यांनाही गौरवण्यात आले.

अंगद गरड, शेखर कुलकर्णी, राजेंद्र महाजन, राजेंद्र पितळीया, सत्यवान वाघमोडे, अशोक आवारी  व भगवान सोनवणे व इतर क्रीडा शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.