Pune News :नवउद्योजकांसाठी विद्यापीठात ‘मेंटॉरशीप प्रोग्राम’

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘इनोफेस्ट २०२१’ मधील अंतिम टप्प्यात निवड झालेल्या स्टार्टअप ग्रुपसाठी तसेच प्राथमिक अवस्थेत स्टार्टअप असलेल्या कंपन्या आदी सर्वांसाठी विद्यापीठाकडून ‘मेंटॉरशीप प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे.

नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी याबाबतची माहिती दिली. डॉ. पालकर म्हणाल्या, ‘यावर्षी घेण्यात आलेल्या इनोफेस्ट मधील ‘आय टू ई’, ‘पिच फेस्ट’ आणि ‘हाकेथॉन’ या स्पर्धेतून निवड झालेल्या स्पर्धकांना याआधी प्री-इंक्युबेशन प्रोग्राममध्ये ३० स्टार्टअप ग्रुपला मेंटॉरशीप प्रोग्राम देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यातून निवड झालेल्या १७ स्टार्टअपना विविध विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’

स्टार्टअपना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळाल्यामुळे योग्य दिशा मिळते त्यामुळे स्टार्टअप अपयशी ठरण्याची शक्यता कमी होते, यासाठी विद्यापीठाकडून वेळोवेळी असे ‘मेंटॉरशीप प्रोग्राम’ घेण्यात येतात, असे पालकर म्हणाल्या.

या प्रोग्राममध्ये आर्थिक, उद्योग क्षेत्र, बाजारभाव, तांत्रिक तसेच कायदेविषयक क्षेत्रातील कुणाल सरपाल, आयआयटी मद्रासचे शिवा सुब्रमण्यम, आयआयटी मुंबई आणि स्टॅंडफोर्ड विद्यापीठाचे नीरज शहा, कौस्तव मुजुमदार, डेकीन डेनी अशा २० तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे.

दरम्यान या प्रशिक्षणाविषयी बोलताना डाॅ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, स्टार्टअपना संरचनात्मक पध्दतीने मार्गदर्शन करणाऱ्या काही निवडक केंद्रामध्ये विद्यापीठाचे हे केंद्र असून केवळ पुण्यातील नव्हे तर भारतातील अनेक विषयतज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यातील निवडक स्टार्टअपना ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ कडून आर्थिक मदतही केली जाणार आहे.’

पुढील सहा महिन्यांसाठी हे प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.