Pimpri News : झोपडपट्टी भागातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पथके तयार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम राबविण्याचे नियोजन केले असून त्यासाठी अधिक पथके तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिकेने काम हाती घेतले आहे. हॉकी पॉलीग्रास मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम बनविण्याचा आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत इंदोर मॉडेलच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहराची संकल्पना पिंपरी चिंचवड शहरात राबविण्याचा मानस असून स्वच्छ शहराला सुंदर करण्यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग 20 आणि 30 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य शाम लांडे, रोहीत काटे, राजु बनसोडे, माऊली थोरात, नगरसदस्या आशा शेंडगे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, स्वाती उर्फ माई काटे, स्वीकृत सदस्य संजय कणसे, ह क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे, सहशहर अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, अनिल राऊत, प्रमोद ओंभासे, दत्तात्रय रामगुडे, सुनिल वाघुंडे, अनिल सुर्यवंशी, रामनाथ टकले, संजय कुलकर्णी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग स्तरावरील समस्या, पावसाळी कामे, अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.  वल्लभनगर बस स्टॉप परिसरातील रहदारीच्या समस्येचे निराकरण करावे, महेशनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करावे, संततुकारामनगर येथील टप-यांची संख्या अधिक असून त्यामुळे वाहतुक कोंडी होत असते त्याकडे लक्ष द्यावे, वल्लभनगर येथील मेट्रो स्टेशन परिसरातील कामे पूर्ण करावे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढवावे, प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधित अधिका-यांनी वारंवार स्थळभेटी करुन काम पूर्ण करावे.

प्रभागातील डी पी रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, दाईची कंपनी जवळ ह प्रभागाचे कार्यालय करावे, नागरिकांना पुरेशा दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, धोकादायक वृक्षांच्या फांद्याची छाटणी करावी, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावावा, ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटरच्या वाहिन्यांचे काम पूर्ण करावे, उद्यानांमध्ये  सुरक्षा रक्षक नेमावे, कुष्ठरोग वसाहतीमध्ये विकासकामे करावी, दापोडी भागात अग्निशमन केंद्र, विद्युत दाहिनी उभारावी,  काढण्यात आलेली जलपर्णी उचलण्याची कार्यवाही करावी, फुलेनगरच्या 18 मीटर रस्त्यांचे काम मार्गी लावावे, भूसंपादन केलेल्या जागांच्या कामाला गती द्यावी.

नदीपात्रात भराव कचरा टाकणा-यांवर कारवाई करावी, काही कामांच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या आहेत मात्र त्या कामाचे आदेश देण्यात आलेले नाही याकडे लक्ष द्यावे, नाशिक फाटा परिसरातील सुशोभिकरण करावे, पिंपरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, स्मार्ट सिटीच्या कामाची माहिती तेथील नगरसदस्यांना देण्यात यावी, दापोडी येथील क्रीडांगणाच्या जागेचे भुसंपादनाचे काम पूर्ण करावे आदी सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या.

त्यावर प्रभागातील ज्वलंत प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रभागस्तरावरील बैठका महत्वपूर्ण ठरतात.  कामांचा निपटारा वेळेत होण्यासाठी प्रशासकीय कार्य़वाही वेळेत होणे आवश्यक आहे.  त्यामधून लोकांचा विश्वास संपादन करुन विकासात्मक गती साधता येते.  चांगल्या कामाचे वेळीच कौतुक केल्यास काम करणा-याला प्रोत्साहन मिळते.  मात्र कामचुकारपणा करणे तसेच अकारण दिरंगाई करणे चुकीचे असून अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा आयुक्त पाटील यांनी अधिकारी कर्मचा-यांना दिला.  लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून नागरिकांच्या हिताची कामे करताना प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवावी.  कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.