Nigdi : चिनी मांजात अडकलेल्या बगळ्याची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज – झाडावर अडकलेल्या चिनी मांजामध्ये बगळा अडकला. जखमी झालेल्या बगळ्याची अग्निशनम विभागकाने सुटका केली. यामध्ये बगळा जखमी झाला आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे आज (रविवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका पादचारी व्यक्तीला झाडावर अनेक पक्षी गोंगाट घालत असल्याचे दिसले. त्यांनी बाजूला थांबून निरखून पाहिले असता एक पक्षी झाडाच्या फांदीवर अडकला असून तो सुटकेसाठी धडपड करीत आहे. त्या पक्ष्याच्या सुटकेसाठी अनेक पक्षी त्याच्या आजूबाजूला ओरडत असल्याचे पादचारी व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशमन उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. मात्र, पक्षी उंच असलेल्या रेनट्रीच्या झाडावर अडकला होता. प्राधिकरण उपकेंद्राच्या जवानांनी मुख्य अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्रातून एक ब्रांटो वाहन घटनास्थळाकडे धावले. साधारणतः 60 फूट उंचीवर स्थलांतरित होणारा बगळा पक्षी अडकल्याचे दिसले. ब्रांटो वाहनाला असलेल्या शिडीच्या मदतीने जवान बगळ्यापासून काही अंतरापर्यंत पोहोचले.

झाडाच्या फांद्या असल्यामुळे जवानांना बगळ्यापर्यंत जाता आले नाही. जवानांनी हूकच्या मदतीने पक्षी अडकलेली फांदी ओढून पाहिले. फांदीमध्ये पतंगासाठी वापरला जाणारा चिनी मांजा अडकला होता. त्या मांजामध्ये पक्षी अडकला होता. पक्ष्याच्या उजव्या पंखाला दुखापत झाली आहे. जवानांनी पक्षीमित्राला फोन करून याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, पक्ष्याला आरामासाठी अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण उपकेंद्रात नेण्यात आले आहे. तिथून पक्षीमित्राकडे पक्ष्याला दिले जाणार आहे.

पतंग उडवण्याच्या तात्पुरत्या मजेसाठी मुक्या पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. चिनी मांजावर बंदी असताना देखील पतंग उडवण्यासाठी हा मांजा वापरला जात आहे. मांजामध्ये अडकून अनेक पक्षी, प्राणी गतप्राण झाले आहेत. तर काही नागरिकांना देखील यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्याला सोडविण्याची कामगिरी अग्निशमन दलाचे सारंग मंगळूरकर, निखिल गोगावले, शाम इंगवले, अंकुश बडे, अमोल चिपळूणकर, विकास बोंगाळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.