SL vs IND 2nd T20I : श्रीलंकेची भारतावर चार गडी राखून मात, श्रीलंकेचे मालिकेतील आव्हान जिवंत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : दुसऱ्या 20/20 सामन्यात श्रीलंका संघाने भारताला चार गडी राखून मात देत मालिकेतले आव्हान जिवंत ठेवले.

कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

आज भारतातर्फे पिंपरीचिंचवडच्या ऋतुराज गायकवाड सह देवदत्त पडीकल, नितीश राणा यांनी 20/20 मध्ये पदार्पण केले. कृणाल पंड्या करोनाग्रस्त झाल्यानंतर कालचा सामना एक दिवस पुढे ढकलला पण एकंदरीतच भारतीय संघावर करोनाचे सावट असल्याचे भयंकर चित्र दिसत होते. म्हणूनच भारताला अकरा खेळाडू मुश्किलीने गोळा करता आले. (जगभर करोना थैमान घालत असताना अशा प्रकारचा धोका का स्वीकारला जातोय हे अनाकलनीय आहे).

भारतातर्फे पहिल्यांदाच खेळताना ऋतूराजला कुठलेही दडपण आहे असे वाटत नव्हते, (सौजन्य जाईल का मग हे आयपीएलला?) कर्णधार शिखर धवन बरोबर त्याने खेळताना चांगली आणि आश्वासक सुरुवात केली. 49 धावांची सलामी देताना त्याने 18 चेंडूत 21 धावा काढल्या खऱ्या पण त्याने मोठी खेळी करण्यात मात्र निराशाच दिली.

त्यानंतर आलेल्या दुसऱ्या नवोदित देवदत्त पडीकल याने सुध्दा चांगली सुरुवात केली, एक षटकार आणि एक चौकार मारत त्याने 23 चेंडूत 29 धावा काढल्या मात्र संघाची धावसंख्या 82 असताना तो तंबूत परतला.

दुसऱ्या बाजूने कर्णधार शिखर धवनसुद्धा जम बसलाय असे वाटत असतानाच 40 धावा काढून बाद झाला. संजू सॅमसनने आज सुद्धा निराशच केले. तो केवळ सात धावा काढून बाद झाला. (आयपीएल मध्ये मोठमोठ्या आव्हानाला लीलया पार करणारा हाच का तो संजू सॅमसन असे प्रश्न आता अनेक टीकाकार करणारच यात गैर काय?).

नितीश राणाला पहिलाच सामना  खेळताना तळाच्या फलंदाजाना सोबत घेऊन चांगला शेवट आणि त्याच्या करियरची चांगली सुरूवात करता आली नाही आणि मोठी कीर्ती असणारा भारतीय संघ 20 षटकात केवळ 132 च धावा काढू शकला.

अर्थात श्रीलंका संघही तसा तुलनेत दुबळा असल्याने दुसऱ्या डावात पावसाचा अंदाज असल्याने आणि भारतीय गोलंदाजी मजबूत असल्याने हा सामना आपण सहजपणे हरणार नाहीत, असे भारतीय चाहते मानत होते. त्यात आज भुवनेश्वर आणि कुलदीप यादवने उत्तम गोलंदाजी करत सामन्यात चुरस निर्माण केली होती तरी सुध्दा, बघता बघता श्रीलंका संघाचे सहा फलंदाज 105 धावसंख्या असतानाच बाद झाल्याने एका क्षणी भारतीय संघ आज कदाचित मालिका जिंकेलही अशी आशा निर्माण झाली होती.

मात्र मिनोद भानुकाच्या उपयुक्त 36 धावा आणि सामनावीर धनंजय डिसिल्वाच्या नाबाद चाळीस धावांनी हे आव्हान फारसे अवघड राहिलेच नाही. आणि करूनारत्नेने महत्वपूर्ण क्षणी भुवनेश्वरला मारलेल्या षटकारामुळे  श्रीलंका विजयासमीप आली आणि विजयी औपचारिकता धनंजय डिसिल्वा ने पूर्ण करत आपल्या संघाला चार गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवून देत मालिकेत बरोबरी साधत उद्याच्या तिसऱ्या आणि अंतीम सामन्यात रंगत येईल याची काळजी घेतली.

संघ अडचणीत असताना समजदार फलंदाजी करत संघाला जिंकून देत नाबाद 40 धावा करणारा धनंजय डिसिल्वा हाच सामनावीर ठरला. आता उद्या होणारा तिसरा आणि अंतिम सामना मालिका कोण जिंकेल हे सांगेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.