Dehugaon News : मुलांना घडवताना माणुसकीची मूल्ये रुजवत वेदनेशी नातं जोडा – डॉ. गिरीश कुलकर्णी

एमपीसी न्यूज – सगळीकडेच मार्कांची लढाई सुरू आहे. मुलांना स्वातंत्र्य द्या, कारण हे स्वातंत्र्यच त्यांना जबाबदार बनवते. फक्त स्वातंत्र्य देताना मुलांना कुठे आवरायचे नि कुठे सोडायचे याचे तारतम्य पालकांनी बाळगायला हवे. शिक्षणासोबतच मुलांमध्ये नागरिकत्वाची मूल्ये, (Dehugaon News) समाजाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास, सामाजिक वास्तव कळण्याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे मार्गदर्शन अहमदनगर येथील स्नेहालय परिवाराचे संस्थापक, समाजसुधारक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.

सृजन फाऊडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने आयोजित केलेल्या ‘सृजनदीप’ व्याख्यानमालेत ‘निराधारांचे होऊया आधार’ या विषयावर बोलताना डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी पालकांना आवाहन केले की, आपल्या घरातील वाढदिवस, स्मृतीदिन साजरे करताना ते सामाजिक संस्थांमध्ये साजरे करा, जेणेकरून तुमच्या मुलांचे वेदनेशी नाते जोडले जाईल.

आम्हाला जे मिळाले नाही ते आमच्या मुलांना मिळावं ही पालकांची इच्छा असते, ही भावना छान आहे पण यातून मुलांना आपण वेदनेपासून, भावनांपासून, दु:खांपासून जितकं लांब ठेऊ तितके आपण त्यांच्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण करत असतो. हे असे करुन आपण मुलांची दु:खांना, अडचणींना, वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांना तोंड देण्याची क्षमताच विकसित होऊ देत नाही,  म्हणूनच मुलांना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये घेऊन गेलं पाहिजे.

Pune News : फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरीता न्यायालयीन लढा देण्याची राज्य सरकारची तयारी

निराधारांची वेदना, त्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. मुळात त्यांना कुणाचा आधार नाही म्हणून त्यांचे शोषण केले जाते. या शोषणाविरुद्ध कोणी तक्रार दाखल करत नाही की कोणी साक्षीदारही होत नाही. समाज यामध्ये हस्तक्षेप करत नाही म्हणून तर समाजात महिला व मुलांचे प्रश्न वाढत चालले आहेत.(Dehugaon News) याविरुद्ध समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून आपण काही केले आहे का?  सगळ्यांनी मिळून या सिस्टिमवर कधी दबाव आणला आहे का? आपल्याला शक्य होईल तेवढा बदल आपण घडऊन आणला पाहिजे. सहवेदना, करुणा , समवेदना ही मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या निराधारांचे दु:ख ऐकून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे.

मुलांना घडवताना माणुसकीची, मानवतेची मूल्ये रुजवा, देशभक्ती रुजवा. खरा देशभक्त कोण हे सांगताना ते म्हणाले की, देशातल्या वंचित माणसांबद्दल ज्यादिवशी तुमच्या मनात सातत्यपूर्ण करुणा, अनुकंपा येईल तोच खरा देशभक्त! सगळ्यांनी मिळून ठरवलं तर निराधारांशी नातं जोडणारी करुणा, वात्सल्य, संवेदना, अनुकंपा असलेली नवी पिढी आपण घडवू शकतो. समाजातील प्रत्येक सामाजिक संस्था कुटूंबांनी वाटून घ्या, यातूनच तुमचं व तुमच्या मुलांचं वेदनेशी, करुणेशी, भारतीयत्वाशी, नागरिकत्वाशी, भारताच्या संविधानाशी, चांगल्या मूल्यव्यवस्थेशी, उज्वल भवितव्याशी नातं जोडू शकेल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तज्ञ मार्गदर्शक,जल व्यवस्थापन मा.श्री.अरुण जोशी यांनी भूषविले.

निराधारांसाठी सातत्याने गेली 35 वर्षे कार्यरत राहून नेत्रदीपक समाजकार्य करणा-या स्नेहालय परिवाराला आर्थिक मदत म्हणून श्रीक्षेत्र देहूचे माजी सरपंच मधुकर कंद व अरुणा मधुकर कंद यांच्या वतीने रुपये 25 हजारांचा धनादेश व पालक निलेश मिरजकर यांनी स्नेहालय संस्थेतील लहान मुलांसाठी दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे साहित्य डॉ. गिरीश कुलकर्णी सरांना सुपूर्द करण्यात आले.

प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  स्नेहालय परिवाराचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या समाजकार्याचा परिचय सृजन फाऊडेशनचे (Dehugaon News) सचिव प्रा. विकास कंद यांनी रसिक श्रोत्यांना करून दिला. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी सूत्रसंचालन तर सहशिक्षिका निलिमा अहिरराव यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.