SSC Exam News : दहावीच्या परीक्षांसाठी नव्या गाईडलाइन्स, प्रत्येक विषयाच्या 100 गुणांचे मूल्यमापन होणार : वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक ( Optional ) CET घेणार

एमपीसीन्यूज : इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारने नवीन गाईडलाइन्स निश्चित केल्या आहेत. त्यानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाच्या 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण, तर गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक याआधारावर 20 गुण दिले जातील. तर नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर 50 गुण अवलंबून असतील. म्हणजेच, जे विद्यार्थी कोविड पूर्व काळात नववीत होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या निकालावर 50 गुण दिले जातील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने दिलेले गुण मान्य नसतील, त्यांच्यासाठी कोविड नंतरच्या काळात परीक्षा आयोजित केली जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. जूनच्या अखेरीस दहावीचा निकाल लावण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘या’ आहेत सरकारच्या गाईडलाइन्स

# कोविड-19च्या संसर्गामुळे राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

# कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसमावेशक धोरण तयार करताना शिक्षण विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत तब्बल 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली.

# सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबत विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

# नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.

# विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण, विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुण (नववी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश आणि दहावी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश)

# संबंधित मूल्यमापन धोरण करताना सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा ) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.

# ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

# विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.

# शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

# मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे .

# फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी (Repeater Student), खाजगी ( Form no.17), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे.

# श्रेणीसुधार योजने ( Class Improvement ) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील.

# विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी सरकार अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक ( Optional ) CET घेणार आहे. या प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. यात 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल .

# इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील.

तसेच त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.