SSC & HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्यात घेण्याचा विचार – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्या दरम्यान घेण्याचा विचार सुरु असल्याच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा या साधरणतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात. परंतु, अद्यापही काही ठिकाणी शाळा सुरु आहेत, काही ठिकाणी सध्या शाळा सुरु करणं शक्य नाही.

यासंदर्भात आपण शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत आहोत. यासंदर्भात माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळासोबत चर्चा सुरु आहेत. प्रयत्न असा सुरु आहे की, सर्वसाधारणपणे मे किंवा एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या जाव्यात. कारण जूनमध्ये कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, तर मे महिन्यात विदर्भात प्रखर उन्हाळा असतो.

त्यामुळे येत्या काळात निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण राहू नये म्हणून आधीच 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, दहावीचे, बारावीचे विषय हे खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणं हे त्यांच्या दृष्टीने काहीसं कठीण आहे.

त्यामुळे या दृष्टीकोणातून आधी काही बाबी तपासून घ्याव्या लागतील, असं त्यांना सांगितलं. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरु आहेत. असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.