ST Ticket Rate Hike Cancelled : ऐन दिवाळीत प्रस्तावित एस. टी. बस तिकीट दरवाढ रद्द !

एमपीसी न्यूज – दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिवाळीपुर्वी दिलासा देणारी बातमी आहे. दरवर्षी दिवाळी सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एस. टी.) करण्यात येणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीत सध्या आहे त्या तिकीट दरात प्रवाशांना संपूर्ण राज्यात प्रवास करता येणार आहे. दरवर्षी दिवाळी काळात एस. टी. प्रशासनाकडून 10 ते 15 टक्के तिकीट दरात वाढ केली जाते. ही वाढ रद्द झाल्याने ऐन दिवाळीत लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे. यंदा लॉकडाऊननंतर लाखो नागरिक आपापल्या गावी परतण्याची शक्यता आह. मात्र नेमके याच काळात तिकीट दरात प्रचंड वाढ होत असते. वाढलेल्या तिकीट दरामुळे प्रवाशांचा खिसा अक्षरश: रिकामा होत असतो. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक प्रवासी तिकीट दराच्या भितीने प्रवासच रद्द करतात.

गावाकडे जाणार्‍या नागरिकांमुळे एस. टी. प्रवासी संख्या वाढत असते. गर्दीच्या काळात महसूल वाढावा या उद्देशाने एस. टी. प्रशासन तिकीट दरात हंगामी वाढ करत असते. मात्र यंदा कोरोनामुळे आर्थिक संकट कायम आहे. या संकटात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब आणि एस.टी. प्रशासनाने गुरूवारी अधिकृतपणे जाहीर केला आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ केली जाते. गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून प्रवाशांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.