Pune : रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावणार – राजेंद्र निंबाळकर

Stagnant slum rehabilitation project to be set up - Rajendra Nimbalkar

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.

‘एसआरए’चे रखडलेले प्रकल्प व इतर प्रश्नांबाबत निंबाळकर यांना निवेदन दिल्यावर त्यांनी लगेचच चर्चेसाठी बोलाविले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व स्लम फ्री स्मार्ट सिटी बाबतच्या आशा पल्लवित केल्या, असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष  संदीप खर्डेकर म्हणाले.

जे प्रकल्प रखडले आहेत अश्यांचा गेले 2/3 दिवस आढावा घेतला जात असून प्रकल्प कोणत्या कारणाने रखडले व त्यातील अडचणी काय आहेत याबाबत संबंधित विकसकाशी चर्चा करत आहोत. ‘एसआरए’ची स्थापना झाल्यापासून 15 वर्षात एकूण 284  प्रस्ताव दाखल झाले.

यातील झोपडीधारकांची संख्या 93  हजार आहे. यातील 219  प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याद्वारे तब्बल 70  हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन शक्य होऊ शकेल. मात्र, विविध कारणाने 45 योजनांची छाननी सुरू असून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत, असेही निंबाळकर यावेळी म्हणाले.

पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर 23  झोपडपट्टया असून सुमारे 50 एकर क्षेत्रात त्या वसलेल्या आहेत. यात सुमारे 50 हजार नागरिक वास्तव्य करतात.

पुणे मनपाने या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव दाखल केल्यास किमान 70 % झोपडीधारकांची पुनर्वसन प्रकल्पास संमती असावी, अशी अट शिथिल करून योजनेला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुधारित नियमावलीला सुद्धा लवकरच मान्यता मिळेल आणि सर्व पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना 9 महिने मुदतवाढ देण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेक विकसकांनी मनपाच्या ट्रांझिट कॅंप मधील रहिवाश्यांचे भाडे भरले नसून ही थकबाकी वसूल करावी, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली.

ज्या ट्रांझिट कॅंपमधे सोसायटी रजिस्टर झाली आहे तेथे देखभाल खर्च दिला जात नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे याकडेही खर्डेकर यांनी लक्ष वेधले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागणे हे स्मार्ट सिटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपण सातत्याने याचा पाठपुरावा करणार असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.