Vadgaon Maval News : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फळणे फाटा चौकी सुरू करा

एमपीसी न्यूज – आंदर मावळ भागातील वाढणारी गुन्हेगारी, पर्यटन लक्षात घेऊन टाकवे बुद्रुक- फळणे फाट्यावर असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करून त्याठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष काळूराम मालपोटे, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राजू शिंदे, मारूती असवले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटनमंत्री नारायण ठाकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ शिंदे, युवा कार्यकर्ते टाकवे आर पी आय अध्यक्ष बबन ओव्हाळ यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंदर मावळ भागात सुमारे 40 ते 45 गावे असून या सर्व गावांसह मुख्य बाजारपेठ असलेल्या टाकवे बुद्रुक गावाचा समावेश वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. दरम्यान काही वर्षांपूर्वी या भागासाठी फळणे फाटा येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती.

या परिसरात दिवसेंदिवस पर्यटन वाढत असून पर्यटकांचा वावर वाढत आहे. तसेच वहानगाव, टाकवे बुद्रुक, माऊ येथे खुनासारखे गंभीर प्रकारही घडले आहेत. याशिवाय आंदरमावळ भागातील सुमारे 40 गावातील  नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी 40 ते 50 कि मी पायपीट करावी लागत आहे.

तसेच टाकवे बुद्रुक येथील आठवडे बाजारामध्ये होणारे छेडछाडीचे प्रकार, या परिसरात वाढत असलेले अवैध धंदे रोखण्यासाठी फळणे फाटा येथे असलेली पोलीस चौकी पूर्ववत सुरू करावी व त्या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.