Nigdi news: ‘श्रेयवादात न अडकता भक्ती-शक्ती येथील उड्डाणपुलाची पुणे-मुंबई लेन सुरू करा’

संतोष सौंदणकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी, भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोरील पुणे-मुंबई महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या काही भागाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, पुलावरील पुणे-मुंबई वाहतुकीसाठीच्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग त्वरीत सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

सौंदणकर म्हणाले, पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.  पुणे-मुंबई लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याची  पालिका प्रशासनाची तयारी दिसत नाही. पुलाच्या काही भागांचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला वळसा घालून पुढे जावे लागते. दरम्यान, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम पूर्णात्वास येत असतानाच श्रेय लाटण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून अटोकाट प्रयत्न होताना दिसत आहे. प्रदेश पातळीवरील भाजप नेत्याच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा बालहट्ट स्थानिक पदाधिकार्‍यांकडून धरला जात आहे. आता महिनाभर आचारसंहिता आहे.

त्यामुळे नेत्यांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी आणखीन किती वेळ प्रतिक्षा करावी लागणार? भाजपच्या श्रेयवादात न अडकता नागरिकांसाठी पुलाची पुणे-मुंबई लेन खुली होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनचालकांना तीन ते चार कि.मी.चा वळसा घालून जाण्याची वेळ येणार नाही. परिणामी, वाहतूककोंडी होणार नाही. कोंडी रोखल्यास वाहतूक पोलिसांवरील येणारा ताण देखील कमी होण्यास मदत होईल. लवकरात लवकर पुलाची पुणे-मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली करून वाहनचालकांना यंदाच्या दिवाळीची गिफ्ट द्यावी, अशी मागणी  महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.