Vadgaon Maval : एमआयडीसीची चौथ्या टप्यातील जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करा

कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील चौथ्या टप्या मधील निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी येथील जमीन संपादनाचा दर निश्चित होऊन दीड वर्ष झाली तरी अद्याप संपादन प्रक्रिया सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी केली आहे.

याबाबत, शांताराम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शासनाने १२ मे २०१७ रोजी औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र.४ साठी निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी या गावातील सुमारे ६ हजार एकर जमीन संपादन करण्याचे धोरण जाहीर केले व त्यानुसार संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर शिक्केही पडले आहेत.

त्यानंतर थेट दोन वर्षांनी १२ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या बैठकीत संपादित जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रति एकरी ७३ लाख रुपये दर निश्चित करण्यात आला व १५ टक्के भूखंड परतावा देण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु दर निश्चित होऊनही संपादनाची पुढील प्रक्रिया मात्र झालेली नाही.

शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर शिक्के पडून दोन वर्षे उलटली, दर निश्चित होऊनही दीड वर्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यासंदर्भात संबंधित विभागाला संपादनाची कार्यवाही तात्काळ करण्याचा आदेश द्यावा तसेच दर निश्चितीपासून दीड वर्षे झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बँक व्याजाप्रमाणे पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, संपादनात न वगळलेल्या व इको सेन्सेटीव्ह झोन असलेल्या जमिनीचे झोन बदलून शेती व ना विकास झोन करावा, प्रत्येक गावाला सर्व सुविधांयुक्त २५ एकर जागा गावठाणासाठी सोडावी, चारही ग्रामपंचायतींना वेगळा निधी द्यावा, शाळा, मैदान, रुग्णालय, पोलीस ठाणे, स्मशानभूमी यासाठी जागा द्यावी, संबंधित गावातील तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे याही मागण्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III