-MPC-TOP-MOST-BANNER-I

Mumbai News : राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे फर्मान; जिल्ह्याबाहेरील पथकाने जिल्ह्यात मद्यासाठा पकडल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक जबाबदार, होणार कठोर कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी नुकताच एक आदेश काढला आहे. या आदेशानुसार जर एखाद्या जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्यासाठा, मद्यार्क, ताडी पकडली तर संबंधित अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच संबंधित अधीक्षक आणि अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी आदेशाद्वारे सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या अवैध मद्य, मद्यार्क आणि ताडी साठा, विक्री होत असल्याबाबत एका बैठकीत तीव्र खेद व्यक्त केला. तसेच अशा प्रकारच्या मद्य, मद्यार्क, ताडी इत्यादीच्या अवैध व्यवहाराविरुद्ध कठोर कारवाई करुन ते तात्काळ कायमस्वरुपी बंद होतील अशी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अशा प्रकारचे अवैध व्यवहार भविष्यात जिथे आढळतील त्या संबंधित जिल्हा अधीक्षकांना याबाबत थेट जबाबदार धरून त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी 19 जुलै रोजी एक आदेश काढला. त्यामध्ये या विभागातील सर्व विभागीय उपआयुक्त व अधीक्षक यांना कठोर सूचना करण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की –

# सर्व संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधीत अवैध धंद्याविरुध्द तात्काळ कठोर पावले उचलावीत.

# संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः सतर्क राहुन तसेच अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांना जागृत करून सर्व हातभट्टी विक्री केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. तसेच यासाठी स्थानिक पोलीस विभागाचेही योग्य ते सहकार्य घ्यावे.

# जिल्हयातील संशयीत व्यक्ती, आरोपी यांचेवर पाळत ठेवून आपल्या जिल्हयात कुठल्याही प्रकारची बनावट मद्य निर्मिती, विक्री होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घ्यावी.

# आपापल्या कार्यक्षेत्रात येणा-या अवैध मद्यावर 100 टक्के अंकुश ठेऊन असे मद्य परजिल्हयातुन किंवा परराज्यातून येत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 तसेच MPDA कायद्याखाली कारवाई करावी.

# या विभागाची अनुज्ञप्ती न घेता अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी. तसेच अवैध मद्यविक्री करणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंदविण्याची दक्षता घ्यावी.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

# आपापल्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही निर्माणीमधून कर चुकविलेले मद्य, मद्यार्कसाठा कुठे आढळून आल्यास त्या संबंधित प्रभारी अधिका-यांसह अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल.

# जिल्हयाच्या कुठल्याही अनुज्ञप्तीमधुन कोणत्याही परिस्थितीत बिना वाहतुक पास मद्याचा साठा किंवा विक्री होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करुन योग्य ती खबदरारी व्यावी.

# बिना वाहतुक पास मद्यसाठ्याचा गुन्हा जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांनी नोंदविल्यास संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचा-यांसह संबंधित जिल्हा अधीक्षकही थेट जबाबदार ठरून कारवाईस पात्र ठरतील.

# आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातून अवैधरित्या मद्य, मद्यार्काचा साठा वाहतुक, विक्री, बाळगणुक होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावी.

# आपापल्या कार्यक्षेत्रात कुठेही अवैधरित्या ताडी निर्मिती, वाहतुक, विक्री वा साठवणुक इत्यादी अवैध व्यवहार आढळुन आल्यास संबंधित अधिका-यांसह अधीक्षकांनाही जबाबदार धरण्यात येऊन कारवाई करण्यात येईल.

# आपापल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत सचेत व सतर्क करुन त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत अवैध मद्य, मद्यार्क, ताडी इत्यादी निर्मिती, वाहतुक, साठवणुक वा विक्री होणार नाही यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 व त्या अंतर्गत वेगवेगळे नियम, आदेश, निर्देश इत्यादीची कठोर अंमलबजावणी करुन अशा प्रकारच्या अवैध मद्य, मद्यार्क, ताडी व्यवहाराविरुध्द व त्यात गुंतलेल्या व्यक्तीविरुध्द जेथे असे व्यवहार होतात त्या जागामालकांविरुध्द तसेच अशा व्यवहारात सहकार्य करणाऱ्या, आर्थिक भाग भांडवल पुरवणा-या, कच्चा माल पुरवणा-या इत्यादी संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

# यापुढे कधीही जिल्ह्याबाहेरील अधिका-यांनी किंवा इतर विभागातील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अवैध मद्य, मद्यार्क, ताडी इत्यादीबाबतचा गंभीर गुन्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आणल्यास संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संबंधित जिल्हा अधीक्षकांनाही थेट जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.

# या निर्देशाच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळी पथके निर्माण करून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत. संबंधीत पथकाने जर अवैध मद्य, मद्यार्क, ताडी इत्यादीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला तर संबंधित जिल्हा अधीक्षकांना थेट जबाबदार धरुन त्यांच्यासह संबंधित अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.