Pimpri News: ‘पवना , मुळा, इंद्रायणी नद्यांच्या सुशोभीकरण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा’

माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी

एमपीसी न्यूज – सामाजिक, आर्थिक, पर्यावरणपूरक, रोजगाराच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यटनाला चालना  मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे सुशोभीकरण करावे. सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत पर्यटन  व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. संतांची भूमी म्हणून तिचा नावलौकिक आहे. या भूमितूनच पवना ,मुळा व इंद्रायणी या नद्या वाहतात.

निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.

_MPC_DIR_MPU_II

पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.

औद्योगिकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक  पिंपरी-चिंचवड शहरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. टाटा मोटर्स ,जनरल मोटर्स ,बजाज आयटी हब ,यासारख्या मोठ-मोठ्या कंपन्या येथे आहेत. देहू, आळंदी यासारख्या तीर्थ क्षेत्रामुळे तसेच पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या लेण्या व गडकिल्ले यामुळे बहुसंख्य पर्यटक येथे येत असतात. या नद्यांचा उपयोग व त्यांचे सुशोभीकरण केले.

तर नद्याही प्रदूषण मुक्त होऊन पर्यटनाला चालना मिळायला उपयोग होईल. अनेकांना रोजगारही प्राप्त होईल. त्यासाठी नद्यांवर पर्यटनासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. जेणेकरून स्थानिक लोकांना रोजगार तसेच नद्या प्रदूषणमुक्त झाल्यामुळे चांगले आरोग्य प्राप्त होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.